कोकण रेल्वे मार्गावर ५५० कर्मचाऱ्यांची गस्त
By admin | Published: June 5, 2015 11:46 PM2015-06-05T23:46:52+5:302015-06-06T00:24:21+5:30
कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २९ मेपासून ‘रेल यात्री उपभोक्ता अभियाना’ला प्रारंभ झाला असून, ९ जून रोजी या अभियानाची सांगता होणार आहे.
रत्नागिरी : मान्सूनपूर्व दक्षतेच्या दृष्टीने कोकण रेल्वेने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. ८ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ५५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक वाटणाऱ्या ७८ क्षेत्रांमध्ये २४ तासांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.
कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २९ मेपासून ‘रेल यात्री उपभोक्ता अभियाना’ला प्रारंभ झाला असून, ९ जून रोजी या अभियानाची सांगता होणार आहे. याची माहिती देण्यासाठी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यानिमित्ताने ७ रोजी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यांचे बक्षीस वितरण ९ जून रोजी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. ते म्हणाले, या अभियानादरम्यान प्रवाशांच्या दोन मागण्या प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोकण रेल्वेचे आरक्षण चार महिने आधी करूनही लगेच गाड्या फुल्ल होतात. यासाठी प्रशासनाने या मार्गावर गाड्या वाढवाव्यात अथवा डबे तरी वाढवावे. तसेच दुसरी मागणी म्हणजे ‘प्लॅटफॉर्म शेल्टर’ची लांबी वाढवावी. या दोन्ही मागण्या योग्य असून, प्रशासनापुढे ठेवण्यात आल्या आहेत. राज्यराणी किंवा शताब्दी या दोन्ही गाड्यांमध्ये डबे वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. हे अभियान सुरू झाल्यानंतर प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान केवळ रेल्वे स्थानके नव्हे; तर रूळांमधील कचराही स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. करबुडे येथील बोगद्यातून दोन ट्रक कचरा गोळा करण्यात आला असून, त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या लक्षणीय दिसून आली, ही बाब गंभीर असल्याचे निकम यांनी सांगितले. या सप्ताहनिमित्ताने रत्नागिरी येथे ८ रोजी आणि कणकवली येथे ९ रोजी प्रवासी आणि कोकण रेल्वे कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पावसाळापूर्व सुरक्षिततेबाबत ते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर आता गस्त सुरू राहणार असून, आजपासून सरावासाठी ही गस्त सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील ७८ क्षेत्रातही गस्त सुरू राहणार आहे. यात ६४ बोगद्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यात संवेदनशील १३ क्षेत्रांमध्ये गस्त सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)