अंगणवाडी सेविकांचा ५ रोजी मंत्रालयावर मोर्चा
By admin | Published: March 30, 2016 10:40 PM2016-03-30T22:40:27+5:302016-03-30T23:53:16+5:30
परूळेकर यांची माहिती : बजेटमध्ये गतवर्षीपेक्षा २ हजार कोटींची कपात
कुडाळ : केंद्र व राज्य सरकारने महिला व बालकल्याणच्या बजेटमध्ये वाढ केलीच नसल्याने मागील वर्षाच्या तुलनेत २ हजार २२८ कोटी रुपयांची कपात केल्यामुळे पुढच्या वर्षातही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वेळेवर मिळण्याची शक्यता अंधुक आहे. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने राज्यव्यापी मोर्चा मुंबई मंत्रालयावर ५ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती सभेच्या जनरल सक्रेटरी कमल परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
या प्रसिद्धीपत्रकात कमल परुळेकर म्हणाल्या की, सन २०१५-१६ ला राज्याने महिला व बालकल्याणसाठी ३५६८ कोटी रुपये बजेट केले होते. त्याआधी काँग्रेस सरकारने मानधन वाढ जाहीर केली. मात्र, परत पैशांची तरतूदच न केल्यामुळे यावर्षी ती वाढ देताना भाजप शिवसेना सरकारच्या नाकीनऊ आले. त्यातून काही शहाणपणा घेण्याऐवजी या सरकारने यावर्षी २०१६-२०१७ च्या बजेटमध्ये महिला बालकल्याण विभागातही फक्त १३४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये ६२ टक्के कपात करून सरकारला या योजनेचा गळा तर घोटायचा नाही ना? असा सवाल कमल परूळेकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
बँक मॅनेजरला विचारणा करा
जिल्हा मध्यवर्ती बँकेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचे मानधन अॅडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत अनेक अंगणवाडी कर्मचारी विचारणा करीत असल्यामुळे त्यांच्या माहितीसाठी कमल परुळेकर यांनी सांगितले की, पगार अॅडव्हान्स घेतल्यापासून पहिले १५ दिवस आय.बी.पी योजनेखाली व्याज बँक घेणार नाही. तरी १६ व्या दिवसापासून अकरा टक्के व्याज सुरु होईल व १ पगार फिटेपर्यंत जे जे पैसे बँक खात्यात जमा होतील ते अॅडव्हान्स पगारापोटी बँक फेडून घेत राहील. सोसायटी हप्ता, विमा हप्ता जावून जे पैसे शिल्लक राहतील ते पुढचे काही महिने अॅडव्हान्सपोटी बँक फेडून घेत राहील, त्यामुळे पुढचे काही महिने मानधनाअभावीच रहावे लागेल. या सर्वांचा विचार करूनच जिल्हा बँकेशी व्यवहार करावा. शाखा मॅनेजरना नियम व कार्यपद्धती विचारावी, असे परुळेकर म्हणाल्या.
आझाद मैदानावर जमावे
बजेटवर १३ एप्रिलपर्यंत चर्चा सुरु आहे. म्हणूनच
५ एप्रिलला मंगळवारी पुन्हा एकदा सर्व संघटनांनी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. सोमवार
४ एप्रिलला मुंबईतील संघटना आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत व राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मंगळवार ५ एप्रिलला मुंबईत जमून कृती समितीने मोर्चा ठरविला आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातून सेविका व मदतनिसांनी ५ तारखेस १० वाजेपर्यंत मुंबईत आझाद मैदानावर जमावे, असे आवाहन परुळेकर यांनी केले आहे.