खारेपाटण येथे काविळीचे ६ रुग्ण

By admin | Published: August 22, 2015 12:17 AM2015-08-22T00:17:56+5:302015-08-22T00:20:04+5:30

दूषित पाण्याचा पुरवठा : आरोग्य विभागाकडून साथ जाहीर

6 patients suffering from acne at Kharepatan | खारेपाटण येथे काविळीचे ६ रुग्ण

खारेपाटण येथे काविळीचे ६ रुग्ण

Next

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे काविळीचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत तातडीने जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने खारेपाटण प्राथमिक प्राथमिक आरोग्यकेंद्राला भेट देण्यात आली. आरोग्य विभागाने साथ जाहीर केली असून साथरोग नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण ग्रामपंचायतअंतर्गत येणारी सार्वजनिक नळयोजना तसेच सार्वजनिक विहीर यामधून लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. खारेपाटण क्षेत्रात येणाऱ्या विविध विहिरी तसेच सार्वजनिक नळपुरवठा करणारी पाण्याची टाकी यामध्ये बऱ्याच दिवसांपासून पाणी शुद्ध करणारी व निर्जंतुकीकरण करणारी पावडर टाकण्यात आलेली नाही, अशी ग्रामस्थांनी संबंधितांना विचारणा केली असता पुढे आली. कावीळने आजारी असलेले रुग्णांमध्ये प्रणय दीपक पिसे, मुराद लतिफ सारंग (सर्व बंदरगाव खारेपाटण) येथील तर चंद्रकला बाबुराव मंडावरे (सर्व रामेश्वरनगर खारेपाटण) यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. सिमरन आब्बास सारंग, शामल प्रकाश कांबळे, धम्मानंद श्रीपत कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने डॉ.नामदेव सोडल तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुबेर मिठारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने भेट देऊन खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. पाणी शुद्धीकरणाबाबत सूचना केल्या. एकंदरीत आरोग्य विभागाकडे आलेल्या अहवालानुसार खारेपाटण येथे बंदरगाव येथील पाणी पिण्यास दूषित असल्याचे समजते. तसेच नळयोजनेद्वारेसुद्धा पाणीपुरवठा करण्यात येणारे पाणी अशुद्ध आहे.
काविळची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने गावात सर्र्वेेक्षण सुरु आहे. वाड्या वस्त्यांमध्ये भेट देऊन मेडिक्लोरचे वाटप करण्यात येते असल्याचे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडावरे यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्य भिकाजी कर्ले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर, शहरप्रमुख शिवाजी राऊत, बबलू बाबरदेसाई, संतोष गाळे, प्रदीप इसवलकर, सुधीर गांधी, उपसरपंच संदेश धुमाळे यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटण येथे भेट देऊन साथ रोगाबाबत माहिती जाणून घेतली.
खारेपाटण ग्रामपंचायतीने नेमलेला जलसुरक्षा रक्षक विहिरींमध्ये पावडर टाकतो की नाही याकडे ग्रामसेवक तसेच सरपंच यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून खारेपाटणमधील बऱ्याच विहिरीत पावडर टाकली नाही. खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील पाणी दूषित असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.
शुक्रवारी दिवसभर ग्रामपंचायत कर्मचारीवर्गाने खारेपाटणमधील सर्व विहिरीतून पाणी शुद्धीकरणाची पावडर टाकण्याचे काम केले तर प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर खारेपाटण येथे सर्व्हे करून रुग्णांची माहिती जाणून घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साळे यांनी सायंकाळी खारेपाटण येथे भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच काविळीच्या रूग्णांना घराकडे जात भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: 6 patients suffering from acne at Kharepatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.