सिंधुदुर्गात ६0% कमी पाऊस
By admin | Published: July 6, 2014 12:29 AM2014-07-06T00:29:35+5:302014-07-06T00:31:06+5:30
५ जुलैपर्यंत १० हजार ७६२ मि. मी.
सिंधुदुर्गनगरी : गतवर्षी ५ जुलैपर्यंत १० हजार ७६२ मि. मी. एवढा पाऊस जिल्ह्यात पडला होता. यंदा मात्र केवळ ४०७५.२० मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो तब्बल ६० टक्क्यांनी कमी असल्याने यंदा तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काल, शुक्रवारी १६.५३ च्या सरासरीने १३२.२० मि.मी. एवढा पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. आज, शनिवारी संध्याकाळपर्यंत पावसाने दडी मारली होती. साधारणत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. मात्र, यावर्षी १२ जून रोजी मान्सून दाखल झाला. तीन ते चार दिवस पाऊस पडून नंतर त्याने दडी मारली. तब्बल २० ते २५ दिवसानंतर पुन्हा ३ जुलैपासून पावसाने सुरुवात केली होती. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर पुन्हा आज सकाळपासून ऊन पडले होते. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)