६४ कोटींचा निधी मंजूर
By admin | Published: February 20, 2015 10:23 PM2015-02-20T22:23:50+5:302015-02-20T23:12:16+5:30
स्थायी समिती सभा : प्रत्येक गावात होणार घनकचरा निर्मूलन प्रकल्प
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावामधील सांडपाणी व घनकचऱ्याची समस्या लक्षात घेऊन शासनाने आता यासाठी प्रत्येक गावात एक प्रकल्प मंजूर केला आहे. यासाठी ६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पहिल्या वर्षी २०५ ग्रामपंचायती व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात हे प्रकल्प होणार आहेत. सन २०१७ पर्यंत जिल्हा सांडपाणी व घनकचरामुक्त करावयाचे आदेशही शासनाने दिले असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती संजय बोंबडी, गुरुनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे, सदस्या अॅड. रेवती राणे, सतीश सावंत, प्रमोद कामत, संग्राम प्रभुगावकर, श्रावणी नाईक, वंदना किनळेकर, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर आदी अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण राज्य २०१९ पर्यंत सांडपाणी व घनकचरामुक्त करावयाचे असताना सिंधुदुर्गाला २०१७ ची डेडलाईन देण्यात आली आहे. यासाठी ६४ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन करण्यात येणार आहे. मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथे एका विहिरीचे काम पूर्ण होऊनही त्या कामाचे बिल त्या ठेकेदारास मिळत नाही.
काम पूर्ण झाले असेल व ग्रामपंचायत त्या ठेकेदाराला वेठीस धरत असेल तर त्यात हस्तक्षेप करावा याकडे सदस्य सतीश सावंत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अखेर त्या कामाची निविदा प्रक्रिया व तांत्रिक पूर्तता पूर्ण करून घेण्यास ग्रामपंचायतीने संधी द्यावी. येत्या २० दिवसात ग्रामपंचायतीने ही पूर्तता न केल्यास त्या विहिरीचा निधी जिल्हा परिषदेने आपल्याकडे घ्यावा व त्या विहिरीचे देयक जिल्हा परिषदेने अदा करावे असा निर्णयही या सभागृहाने घेतला. जिल्ह्यात नवीन ३० वर्गखोल्या सुरु होत असून ७५ टक्के निधी प्राप्त झाला आहे. तर ६२ शाळा अत्यंत नादुरुस्त असून त्यासाठी निधी मागण्यात आल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानकउून देण्यात
आली. (प्रतिनिधी)
सिंधु सरस ठरले फोल
सिंधु सरस प्रदर्शनाची वेळ चुकून गेली असून अत्यंत घाईगडबडीने ते घेण्यात आले. पाच दिवसांच्या या प्रदर्शनास साडेसात लाख खर्च झाले. मात्र बचतगटाच्या विक्रीतून केवळ ४ लाख ६८ हजार रुपयांचीच उलाढाल केली. त्यामुळे हे सिंधु सरस प्रदर्शन फोल ठरल्याबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या चर्चेत जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, सतीश सावंत यांनी सहभाग घेतला होता.
कणकवली गटविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर
कणकवली तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचे काम न करणाऱ्या कणकवलीचे गटविकास अधिकाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर जावे लागणार आहे.
या विषयावर अनेकदा सभांमध्ये गदारोळ झाला होता. फक्त कणकवली तालुक्यातच या योजनेंतर्गत काम होत नाही तर उर्वरित तालुक्यांमध्ये कामे होतात. त्यामुळे बिडीओंबाबत पुन्हा आक्षेप घेण्यात आला.
यामुळे कार्यभार दुसऱ्या बिडीओंकडे द्या अशी मागणी सदस्यांची होती. त्यानुसार अखेर बिडीओ रजेवर जात असल्याची माहिती देण्यात आली.
दुर्धर आजारातील १२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून एकूण १४० प्रस्ताव आता मंजूर होतील तर आणखी ४० प्रस्ताव दाखल झाले असून ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.