कणकवलीत सरासरी ६५ टक्के मतदान

By admin | Published: February 21, 2017 11:40 PM2017-02-21T23:40:54+5:302017-02-21T23:40:54+5:30

६४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : किरकोळ बाचाबाची वगळता अनुचित प्रकार नाही

65 percent of the average voting in Kankavli | कणकवलीत सरासरी ६५ टक्के मतदान

कणकवलीत सरासरी ६५ टक्के मतदान

Next



कणकवली : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठीच्या २१ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठीच्या ४३ अशा ६४ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. रविवारी वरवडे येथे घडलेली मारहाणीची घटना तसेच दारिस्ते येथील किरकोळ बाचाबाचीच्या घटनेव्यतिरिक्त तालुक्यात शांततेत सुमारे सरासरी ६५ टक्के मतदान झाले.
कणकवली तालुक्यात १२६ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान झाले. सकाळी ७.३0 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३0 वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ११.५२ टक्के मतदान झाले होते. तर कासार्डे मतदान केंद्रावर या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २४ टक्के मतदान झाले होते.
सकाळी ११.३0 वाजेपर्यंत २८.७८ टक्के , दुपारी १.३0 वाजेपर्यंत ४६. ६४ टक्के, दुपारी ३.३0 वाजेपर्यंत ५६.६९ टक्के मतदान झाले होते. दिवसभर झालेल्या मतदानाचा ओघ पहाता सायंकाळी ५.३0 वाजता मतदानाचा कालावधी संपेपर्यंत सरासरी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील ठिकठिकाणांच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे पुन्हा कणकवली महाविद्यालयाच्या एच. पी. सी. एल. सभागृहातील स्ट्रॉन्ग रूममध्ये जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे शेवटची मतदानाची नेमकी आकडेवारी समजू शकली नाही. निवडणूक निरीक्षक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गणेश महाडिक, शिरस्तेदार पी.बी. पळसुले, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा आदी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच हे अधिकारी मतदान प्रक्रियेवर दिवसभर लक्ष ठेवून होते.
अनेक गावातील वृध्द तसेच अपंग व्यक्तिंनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ११.३0 ते १.३0 या कालावधीत भर उन्हातही मतदारांनी मतदान केले. या कालावधीत अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी जास्त होती. राजकीय पक्षांनी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. तर ठिकठिकाणी लावलेल्या बुथवरही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत
होती. (प्रतिनिधी)
बंडखोर बाजी मारणार काय?
तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या संदेश सावंत- पटेल यांनी बंडखोरी केली आहे. तर पंचायत समितीच्या लोरे मतदार संघातून काँग्रेसच्या राजेश रावराणे व तळेरे मतदार संघातून जयप्रकाश जाधव , भाजपच्या संजय नकाशे यांनी कासार्डे व तन्वी मोदी यांनी फोंडा मतदार संघातून तर शिवसेनेच्या विश्वनाथ आचरेकर यांनी कलमठ मतदार संघातून बंडखोरी केली आहे.
बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील भाजपच्या सुनील तांबे यांनाही आपला अर्ज मागे घेता आलेला नाही. शिवसेनेच्या विश्वनाथ आचरेकर यांनी विनायक मेस्त्री यांना तर सुनील तांबे यांनी भाजपच्या विजय तांबे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित बंडखोर या निवडणुकीत बाजी मारणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: 65 percent of the average voting in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.