सिंधुदुर्ग  : चांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:27 PM2018-08-09T12:27:45+5:302018-08-09T12:31:50+5:30

चांदा ते बांदा या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १०० कोटींपैकी ६७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित लाभार्थ्याने जामसंडे येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा.

67 million received from Sindhudurg Chanda to Banda: Ajit Gogate | सिंधुदुर्ग  : चांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे

सिंधुदुर्ग  : चांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे

googlenewsNext
ठळक मुद्देचांदा ते बांदा अंतर्गत ६७ कोटींचा निधी प्राप्त : अजित गोगटे विविध योजनांच्या लाभासाठी भाजपा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

देवगड : चांदा ते बांदा या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १०० कोटींपैकी ६७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित लाभार्थ्याने जामसंडे येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेंतर्गत जलसंधारण विभागामार्फत देवगड तालुक्यातील चिरेखाणीमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवावा अशी मागणी करणार असल्याची माहिती चांदा ते बांदा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य अ‍ॅड. अजित गोगटे यांनी दिली.

जामसंडे येथील भाजपा कार्यालयात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गोगटे म्हणाले की, २०१५ साली चांदा ते बांदा योजनेचा निर्णय होऊन २०१६ साली या योजनेला मंजुरी मिळाली. यात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यांतील निसर्ग संपत्तीवर आधारित पायलट प्रोजेक्ट करून या जिल्ह्यांचा विकास करावा या उद्देशाने योजनेची सुरुवात झाली.

प्रामुख्याने हे दोन्ही जिल्हे अर्थमंत्री व अर्थ राज्यमंत्री यांचे असल्याने या जिल्ह्यांचा विकास विविध योजनेतून करण्याकरिता १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला ६७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे.

याचबरोबर या योजनेमध्ये पर्यटनाकरिता ३५ कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी २१ कोटी रुपये मान्य झाले आहेत. यात नापणे, सावडाव धबधब्यांकरिता १ कोटी ८५ लाख तसेच वॉटर स्पोर्टस्, केरळ-अलपै निवास न्याहारी, पर्यटन सुविधा, खाडीपात्रातील गाळ उपसा करणे व त्यामध्ये पर्यटन बोटी यांचा समावेश असून देवगड तालुक्यात असे उपक्रम राबविण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा.

कृषी क्षेत्राकरिता २५ कोटींपैकी ११.२० लाख रुपये उपलब्ध आहेत. यामध्ये भात लागवड, दुबार पिके, जुनाट आम्रवृक्षाचे पुनरूज्जीवन, काजू उत्पादन वाढविणे, आवश्यक ती शेती अवजारे, कोकम, जांभूळ, फणस लागवड याकरिता कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

यात ५० लाख रुपये एवढा निधी उपलब्ध असून ३५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. प्रामुख्याने बेबी स्वीट कॉर्न प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबरोबरच जलसंधारण व कृषी विभागामार्फत १९ कोटी २० लाख रुपये प्राप्त असून यात वळणबंधारे व अन्य बंधाºयांची मागणी करण्यात येऊ शकते.

पशुसंवर्धन विभागाकरिता शेळीपालन व अन्य व्यवसायांकरिता २ कोटी ५२ लाख रुपये व मत्स्य व्यवसाय, खेकडा पालन याकरिता ८० लाख रुपये, छोट्या मच्छिमारांना फ्रिज ८ लाख रुपये, जेटीवर सोलर दिवे ४२ लाख रुपये याचबरोबरच जेटी दुरुस्तीकरिता २ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त असून मत्स्य व्यवसाय यांत्रिकीकरणांतर्गत छोट्या होडीव्दारे मच्छिमारांना इंजिन पुरविणे यासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच लघुउद्योग, लाकडी खेळणी यासाठीदेखील प्रत्येकी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तरी चांदा ते बांदा या योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित विभागाकडे लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी भाजपा कार्यालय देवगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅड. अजित गोगटे यांनी केले आहे.

मधुमक्षिकामध्ये समावेशाची मागणी

जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असून त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील प्रमुख क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी समितीचे सदस्य म्हणून निवडण्यात आली आहेत. त्यात आपली निवड करण्यात आली असल्याचे अजित गोगटे यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध विभागांची माहिती घेतली असता खादी ग्रामोद्योगअंतर्गत पाच कोटीपैकी दोन कोटी चाळीस लाख रुपये प्राप्त झाले असून यात निरा प्रकल्प व मधुमक्षिका पालन यांचा समावेश आहे.

देवगड तालुक्यात आंबा बागायतीवर कीटकनाशकांची फवारणी होत असल्याने मधुमक्षिका पालनाकरिता देवगड तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसून आले. परंतु अशा व्यवसायास देवगड तालुक्यात अन्य ठिकाणी निश्चितच प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकरिता देवगड तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
 

Web Title: 67 million received from Sindhudurg Chanda to Banda: Ajit Gogate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.