जिल्ह्यात ६८% मतदान

By admin | Published: February 21, 2017 11:19 PM2017-02-21T23:19:53+5:302017-02-21T23:19:53+5:30

६३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

68% turnout in the district | जिल्ह्यात ६८% मतदान

जिल्ह्यात ६८% मतदान

Next



रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ५६५ केंद्रांवर सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. खेड तालुक्यात मतदान केंद्रातच एका वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू, खेडकडे मतदानासाठी येताना झालेला एका मतदाराचा मृत्यू आणि असुर्डे येथे शिवीगाळ तसेच धमकावण्याच्या प्रकारामुळे काहीसे गालबोट लागले. शिवीगाळ प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी मंगळवारी १५६५ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७१ हजार ८१६ मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार २३२ मतदारांनी (५३.८६ टक्के) मतदान केले. यात पुरुष मतदारांची संख्या दोन लाख ७२ हजार ५२२, तर महिलांची संख्या तीन लाख चार हजार ७१० इतकी आहे.
जिल्ह्यातील बहुसंख्य मतदान केंद्रे दुर्गम भागात असल्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी रात्री उशिरा मिळाली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले असल्याचा अंदाज प्रशासकीय
सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान चिपळूण तालुक्यात (५८.४१ टक्के); त्याखालोखाल
गुहागर तालुक्यात (५७.५४ टक्के) झाले होते.
गुहागर, राजापूर, रत्नागिरी, खेड, दापोली, लांजा या तालुक्यांमध्ये मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, कर्मचाऱ्यांनी तातडीने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू राहिली. काही काळ मतदान थांबले होते.
जिल्ह्यात ६३५ उमेदवार उभे आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेसाठी २२६, तर पंचायत समितीसाठी ४०९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
उद्या, गुरुवारी तालुक्यांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी
हृदयविकाराच्या
धक्क्याने दोघांचा मृत्यू
खेड तालुक्यात सुकीवली येथे मतदानासाठी केंद्रावर गेलेले ६४ वर्षीय वृद्ध माजी सैनिक महादेव शिवराम चाळके यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. ते सकाळी ११.३० वाजता मतदान केंद्रात गेले. सुमारे तासभर रांगेत उभे होते. मात्र, मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावतानाच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा तसेच नातवंडे असा परिवार आहे़ मुंबईमध्ये असणारे याच तालुक्यातील साखरोली गावचे रहिवासी संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी म्हणून मुंबईहून खेडकडे येत होते. पोलादपूर येथे बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: 68% turnout in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.