पाटीलकीविना ६८ गावे...
By admin | Published: April 12, 2016 11:53 PM2016-04-12T23:53:05+5:302016-04-13T00:11:01+5:30
जिल्ह्यातील स्थिती : अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पाटलांवर
गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी --पोलिस पाटील भरती प्रक्रिया न राबविली गेल्याने सिंधुदुर्गातील तब्बल ६८ गावे पोलिस पाटील पदाविना शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे या गावचा अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पोलिस पाटलांवर पडलेला आहे.
गावकीच्या राजकारणामध्ये पोलिस पाटलांना गावच्या पाटलाचा दर्जा असल्यामुळे या पदाला मोठा मान आहे. प्रशासन व गावकऱ्यांमधील दुवा म्हणून पोलिस पाटलांची ओळख आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिस पाटलावर असते. पूर्वीपासून गावागावात ही पदे कार्यरत आहेत. विशेषकरून पोलिस खाते, तहसीलदार यांच्याशी या पदाचा जवळचा संबंध येतो. गावागावातील कायदा व सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरवणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तींची माहिती तहसिलदारांना कळविणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, अशी कामे पोलिस पाटलांवर सोपविण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्गाचा विचार केला तर सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तीन उपविभागामध्ये एकूण पोलिस पाटलांच्या ४६२ मंजूर पदांपैकी ३९४ पदेही भरण्यात आलेली आहेत.
यातील काही पदांसाठी जाहिरनामा काढण्यात आला आहे. मात्र त्याची पुढील कार्यवाही होताना दिसून येत नाही. या रिक्त पदांमध्ये दोन ठिकाणच्या गावातील पोलिस पाटलांना बडतर्फ तर पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर वैभववाडीमध्ये एक पद न्यायप्रविष्ठ राहिले आहे.
आरक्षणानुसार उमेदवारच नाहीत
जिल्ह्यातील रिक्त ६८ पदांपैकी ४१ रिक्त पदे भरतीचा जाहिरनामा होता. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सदयस्थितीत प्रशासनाच्या रेकॉर्डला ६८ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया राबवूनही या पदांसाठी विशिष्ट आरक्षण पडल्याने व त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने हे पद अखेर रिक्त राहिले आहे.
दोन पोलिस पाटलांना केले बडतर्फ
सावंतवाडी उपविभागातील दोन गावामधील पोलिस पाटलांना प्रशासनाने बडतर्फ केले आहे. कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर ७ पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १० पोलिस पाटील मयत झाल्यानने पदे रिक्त राहिली आहेत.