खवले मांजर तस्करांना ७ दिवसांची वन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:57 PM2019-04-09T15:57:34+5:302019-04-09T16:00:28+5:30
मुंबई -गोवा महामार्गावर असलदे पुलानजीक अतिदुर्मिळ असलेल्या जिवंत खवले मांजराची तस्करी करताना ५ जणांना सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत
कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर असलदे पुलानजीक अतिदुर्मिळ असलेल्या जिवंत खवले मांजराची तस्करी करताना ५ जणांना सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत रंगेहात पकडले होते. या खवले मांजर तस्करांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नरुद्दीन कादिर शिरगावकर, सचिन पांडुरंग घाडीगांवकर, गणपत सत्यवान घाडीगांवकर, प्रकाश शांताराम गुरव या चौघांना सोमवारी दुपारी जिवंत खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. तर पाचवा आरोपी प्रवीण श्रीधर गोडे हा कारवाईच्या वेळी पसार झाला होता.
मात्र, वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांनी सापळा रचत सायंकाळी प्रवीण गोडे याच्याही मुसक्या आवळल्या होत्या. या पाच आरोपींपैकी नरुद्दीन शिरगावकर हा १ नंबरचा आरोपी आहे. नरुद्दीन शिरगावकर व प्रवीण गोडे यांनीच खवले मांजराच्या विक्रीबाबत आर्थिक बोलणी केली होती . तर प्रकाश गुरव याने खवले मांजर पकडले होते . असे वन विभागाच्या तपासात आता स्पष्ट झाले आहे.
या पाच आरोपींव्यतिरिक्त आणखिन एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच तस्कराना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. हे सर्व आरोपी एकमेकांना कसे ओळखतात ? त्यांनी खवले मांजर कसे पकडले ?
खवले मांजर पकडण्यासाठी कोणते हत्यार अथवा जाळे वापरले ? ते खवले मांजर कोणाला विकणार होते ? आंतरराष्ट्रीय तस्करांशी या आरोपींचे कनेक्शन आहे का ? खरेदीदारांशी आरोपींनी आर्थिक व्यवहार केलाय का ?
आर्थिक व्यवहार केला असल्यास किती रक्कम घेतली ? घेतलेली रक्कम कुठे ठेवली ?
आदी मुद्यांचा तपास करण्यासाठी न्यायालयाकडे आरोपींची वनकोठडी मागण्यात आली होती .
यावेळी सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यामुळे कणकवली येथील न्यायालयाने खवले मांजर तस्कराना ७ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर पुढील तपास करीत आहेत.
खवले मांजर