दांडी-वायरी किनार्यावर ७० टन मासळी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:09 PM2017-12-10T23:09:17+5:302017-12-10T23:12:40+5:30
मालवण : ओखी वादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीतील मच्छिमार नौका व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात कोसळलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणाºया आणि नुकसानीमुळे चिंताग्रस्त दर्याराजासाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओखीच्या तडाख्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, छोट्या मच्छिमारांना तारण्यासाठी ‘तारली’ मासळी धावून आली आहे.
दांडी-वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीच्या जाळ्यात अपेक्षेपेक्षा जास्त अशी तब्बल ७० टन मासळी सापडली. यामुळे दांडी-वायरी किनारपट्टीवर तारली मासळीचा खच पडला होता. ती एकत्र करून निर्यात करण्याचे काम रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पारंपरिक मच्छिमारांच्या रापणीत मासळी मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दांडी-वायरी परिसरात तोडणकर यांचा पारंपरिक रापण संघ आहे. याच रापण संघाला ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. यात रापणीच्या नौकेचे नुकसान झालेच शिवाय जाळीही तुटून गेल्याने रापण संघावर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर आठवडाभर बंद असलेली मासेमारी दोन दिवसांपासून पूर्वपदावर येत आहे. दांडी येथील समुद्रात नारायण तोडणकर रापण संघाने शनिवारी रात्री जाळी मारली होती. त्यानंतर रविवारी सकाळी जाळी ओढताना अनपेक्षित तारली मासळी जाळ्यात सापडून आल्याने मच्छिमारांना आश्चर्याचा धक्काच बसला. एक-एक करता करता १०० खंडीपेक्षा जास्त मासळी तुळस-वेंगुर्ले येथील आकाश फिश मिल येथे निर्यात करण्यात आली. यावेळी समुद्रकिनाºयावर मासळी वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांनी बंपर तारलीचा आनंद लुटला.
किनारपट्टीवर दूरवर पसरला मासळीचा खच
नारायण तोडणकर रापण संघाला संकटातून मार्ग काढण्यासाठी निसर्गच धावून आला. नुकसानग्रस्त रापण संघाला निसर्गाने रविवारी भरभरून तारलीची देणगी देत कोसळलेल्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न केला. वायरी किनारपट्टीवर लावण्यात आलेल्या रापणीत १०० खंडीपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे ७० टनपेक्षा जास्त तारली मासळी मिळाली. काही किलोमीटर लांब असलेल्या रापणीचे जाळे मासळीने तुडुंब भरून गेले. तरीही वाहून जाणारा मासळीचा खच किनारपट्टीवर दूरवर पसरला होता.