जिल्ह्यात ७०% मतदान
By admin | Published: February 21, 2017 11:25 PM2017-02-21T23:25:17+5:302017-02-21T23:25:17+5:30
४८५ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद : किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान झाले. गतवेळच्या (२०१२) निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते. या मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी ब्रेक करीत यावेळी सरासरी तब्बल ७० टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. मतदानादिवशी काही किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तीन मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने त्याठिकाणी तत्काळ नवीन यंत्रे कार्यान्वित करण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या ४८५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रांत बंद झाले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी मतमोजणीची उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन तास मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी जिल्ह्यात ८३८ मतदान केंद्रे स्थापन केली होती.जिल्ह्यात सकाळी ९.३० पर्यंत १२.२९ टक्के मतदान झाले. दुपारी ११.३० वाजेपर्यंत २८.३६ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४५.२७ टक्के, तर ३.३० पर्यंत ५७.०४ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ दिसून येत होती. युवा मतदारांसह ज्येष्ठ मतदारांची संख्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. काही किरकोळ घटना वगळता बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. (प्रतिनिधी)
तीन मशीनमध्ये बिघाड
जिल्ह्यातील ८३८ मतदान केंद्रांपैकी तीन मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रांत बिघाड झाला. कास, आरोसबाग व कसाल येथील मतदान केंद्रांतील मशीन बंद झाल्याने ती बदलण्यात आली, तर वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील मतदान केंद्रातील मशीनमध्ये काहीवेळ तांत्रिक बिघाड झाला होता, तो तज्ज्ञांमार्फत दूर करण्यात आला.
कुडाळात लक्षवेधी लढती
जिल्ह्यातील बहुतांशी चुरशीच्या लढती कुडाळमधून होत आहेत. यामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भारिप, रिपाइं, बसप आदी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक लक्षवेधी लढती कुडाळ तालुक्यात होत असल्याने याठिकाणी झालेल्या मतदानावर बहुतांशी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यादीतून मतदारांची नावेच गायब
कुडाळ तालुक्यातील निळेली, गोठोससह काही गावांतील मतदार यादीत ठराविक मतदारांची नावेच यादीतून गायब होती. असाच प्रकार जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये होता. त्यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकाराने काहीकाळ गोंधळ उडाला.