डॉल्फिनला वाचविण्यासाठी ७१ शास्त्रज्ञ आले एकत्र, समोर अनेक आव्हाने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:42 PM2024-09-13T12:42:24+5:302024-09-13T12:43:20+5:30
पश्चिम हिंद महासागरात कॉन्झर्व्हेशन नेटवर्कद्वारे संवर्धनासाठी करणार प्रयत्न
संदीप बोडवे
मालवण : पश्चिम हिंद महासागर क्षेत्रामधील १७ देशांतील ७१सागरी जीवशास्त्रज्ञ डॉल्फिनच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन कॉन्झर्व्हेशन नेटवर्क (HuDoNet) या नावाने नेटवर्क तयार केले असून इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनच्या संवर्धनासाठी ते काम करणार आहेत.
दक्षिण आणि पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया, भारत आणि श्रीलंकेच्या टोकापर्यंत तसेच मादागास्कर आणि मेयोटसारख्या बेटांमधील हिंद महासागराच्या अरुंद पट्ट्यात इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनचा अधिवास आढळतो. लहान गटाने वास्तव्य करणारे दुर्मीळ असे हंपबॅक डॉल्फिन फक्त उथळ पाण्यात आढळतात, सहसा किनाऱ्याच्या अगदी जवळ असतात.
अधिवास कमी होत चाललाय..
कॉन्झर्व्हेशन नेटवर्कचे समन्वयक डॉ. शानन ॲटकिन्स म्हणाले, जास्त मानवी लोकसंख्या असलेल्या किनारपट्टीच्या जवळ या डॉल्फिनचा अधिवास कमी होत चालला आहे. सागरातील मानवी हस्तक्षेपामुळे डॉल्फिनचे अस्तित्व धोक्यात येत असून, ते समजणे आणि मोजणे आव्हानात्मक आहे.
समोर अनेक आव्हाने
भारतातील हंपबॅक डॉल्फिनचा अभ्यास करणाऱ्या केतकी जोग म्हणतात, डॉल्फिन संशोधकांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. संशोधनाच्या दीर्घकाल चालणाऱ्या प्रयत्नांना टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक अभाव हेसुद्धा एक आमच्यासमोर मोठे आव्हान आहे.
अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव
दक्षिण आफ्रिकेतील साशा डायन्स म्हणतात, आमच्याकडे संशोधनासाठी लागणारी उपकरणे, कर्मचारी आणि निधी मर्यादित आहे. या श्रेणीतील डॉल्फिनचा पूर्व अभ्यास, तांत्रिक समर्थन आणि उपायांचा तसेच या प्रजातीबद्दल जागरूकता नसणे आणि अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव आहे.