स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 10:20 PM2018-05-23T22:20:49+5:302018-05-23T22:20:49+5:30

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 71 वर्षे अंधारात चाचपडणारी करुळ केगदवाडी महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली.

71 years after Independence 'Bright' Kigadwadi | स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी

स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी 'उजळली' केगदवाडी

Next

 वैभववाडी - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 71 वर्षे अंधारात चाचपडणारी करुळ केगदवाडी महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघाली. बारा कुटुंबाच्या धनगरवस्तीवरील वीज, रस्ता व पाण्याच्या समस्येचे भयाण वास्तव अडीच वर्षांपुर्वी 'लोकमत'ने मांडल्यानंतर अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला गती येऊन मागील पाच पिढ्यांपासून केगदवाडीवासियांसाठी स्वप्नवत असलेला वीजपुरवठा अखेर बुधवारी सुरु झाला. त्यामुळे केगदवाडीच्या रहिवाशांना अक्षरशः आकाश ठेंगणे झाले.

      एका बाजूला करुळ घाट आणि उर्वरित तिन्ही बाजूंनी वनखात्याच्या जंगलाचा वेढा पडल्याने केगदवाडीच्या पाच पिढ्या वीज, रस्ता व पाण्यासाठी संघर्ष करण्यात गेल्या. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र, वनखात्याच्या जागेवर येऊन अडणारं घोडं पुढे सरकण्याचं नाव घेत नव्हते. त्यामुळे केगदवाडीचे भयाण वास्तव 22 नोव्हेंबर 2015 ला 'लोकमत'ने ठळकपणे मांडून कित्येक वर्षांच्या पाठपुराव्याला बळ दिले. त्यानंतरच ख-या अर्थाने  केगदवाडीच्या वीजेचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याला गती मिळाली. त्यानंतर आमदार नीतेश राणे व खासदार विनायक राऊत यांनीही या गंभीर समस्येचा शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये वनखात्याची ना हरकत मिळून केगदवाडीच्या वीजवाहीन्यांचे काम सुरु झाले होते.

     वनखात्याला लागणा-या कागदपत्रांची पुर्तता करुन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस बी लोथे यांनी दाखविलेली सकारात्मकता दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे अखेर करुळ केगदवाडीच्या वीज सेवेचा विषय मार्गी लागून उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांनी केगदवाडी येथील वीज जनित्राची फित कापून उद्घाटन करीत बुधवारी सायंकाळी बहुप्रतिक्षित वीजपुरवठा सुरु केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, सरपंच सरिता कदम, माजी सरपंच रमेश सुतार, वनक्षेत्रपाल स.बा.सोनवडे, वनपाल चंद्रकांत देशमुख, करुळ वनरक्षक संदीप पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत पाटील, संतोष बोडके, गजानन पाटील, राजेंद्र गुरखे, बापु गुरखे आदी उपस्थित होते.

     यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण म्हणाले की, सर्व यंत्रणा एकत्र आली की अशक्य काम कसे शक्य होते याचे केगदवाडीचा वीजपुरवठा हे उत्तम उदाहरण आहे. या वाडीचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक विभागाने मेहनत घेतली. यामुळेच हा विषय मार्गी लागल्याचे स्पष्ट करीत वनविभागाबाबत समाजात जी नकारात्मक भुमिका आहे ती चुकीची आहे. वनविभाग काय सर्व विभाग शासन निर्णयाच्या अधिन राहून काम करतात. त्यामुळे कोणत्याही बाबीचा पाठपुरावा नियमात बसवून योग्य प्रकारे झाला तर कोणताही प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही हेही यानिमित्ताने सिध्द झाले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

 आजचा दिवस भाग्याचा: धोंडू गुरखे 
     
     आजचा दिवस भाग्याचा व आमच्यासाठी आनंदाचा आहे. आम्ही गेली कित्येक वर्ष अंधारात काढली. मात्र अखेर आज वाड्यावर लाईट आली याचा आनंद झाला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, गावक-यासह अनेकांचे सहकार्य लाभले. सर्वांच्या प्रयत्नांमुळे वीजेचा विषय सुटला. आता आमचा रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागून खडतर जीवन सुसह्य व्हावे, एवढीच आमची मागणी आहे, भावुक उद्गार केगदवाडीचे रहिवाशी धोंडु गुरखे यांनी वस्तीचा वीज पुरवठा सुरु झाल्यावर व्यक्त केले.

Web Title: 71 years after Independence 'Bright' Kigadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.