‘कुडाळ’साठी ७३ टक्के मतदान
By admin | Published: April 17, 2016 11:17 PM2016-04-17T23:17:48+5:302016-04-18T01:20:21+5:30
निवडणूक प्रक्रिया शांततेत : आज दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ७३ टक्के मतदान झाले असून, १२ हजार ६७ मतदारांपैकी आठ हजार ८८२ मतदारांनी हक्क बजाविला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही. मतमोजणीनंतर आज, सोमवारी लागणाऱ्या नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडली. १७ प्रभागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते. १७ मतदान केंद्रे्र होती. मतदारांनी सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दुपारी कडक उन्हामुळे मतदार घराबाहेर पडले नव्हते. सायंकाळी उशिरा मतदानाचा ओघ पुन्हा वाढला.
मतदानादिवशी कुडाळ शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तसेच जास्तीतजास्त पोलिस कुमकही संवेदनशील मतदान केंद्रांवर लावण्यात आली होती. (प्रतिनिधी)
राजकीय पुढाऱ्यांची धावपळ
रविवारी फक्त कुडाळची निवडणूक असल्याने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी हे कुडाळमध्ये ठाण मांडून बसले होते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.
सत्ता कुणाची ते
आज कळणार
कुडाळ नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार याची चर्चा शहरात सुरू होती. आज, सोमवारी मतमोजणी असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत येथील सर्व चित्र स्पष्ट होईल. ही मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.
त्रिशंकू होण्याची शक्यता
कुडाळ नगरपंचायतीवर कोणा एकाचीच सत्ता येणार नसून, कुडाळमध्ये त्रिशंकू स्थिती राहील, अशी चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये जोरदार सुरू आहे.
प्रभाग क्र.१ मध्ये सर्वाधिक मतदान
या निवडणुकीत प्रभाग क्र. १ कविलकाटे येथे ८१.५७ टक्के सर्वाधिक, तर प्रभाग क्र. ११ वाघसावंत टेंब येथे ६४.५२ टक्के एवढे कमी मतदान झाले.