सिंधुदुर्गात ७,९७७ शेतकरी खावटी कर्जमाफीला पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:37 AM2019-02-28T11:37:41+5:302019-02-28T11:39:59+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये सिंधुदुर्गातील खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ७ हजार ९७७ खावटी कर्जदार या योजनेचा लाभास पात्र ठरले आहेत. त्यातील ७ हजार ७८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. तर कर्ज घेतलेल्या पैकी १०५ मृत किंवा बाहेरगावी, २५ नोकरदार किंवा पेन्शनदार आहेत. तर ५९ प्रकरणे संस्थेकडे प्रलंबित आहेत.
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये सिंधुदुर्गातील खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ७ हजार ९७७ खावटी कर्जदार या योजनेचा लाभास पात्र ठरले आहेत. त्यातील ७ हजार ७८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. तर कर्ज घेतलेल्या पैकी १०५ मृत किंवा बाहेरगावी, २५ नोकरदार किंवा पेन्शनदार आहेत. तर ५९ प्रकरणे संस्थेकडे प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शेतकरी सन्मान योजनेत समावेश करीत खावटी कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८७ संस्थांच्या मार्फत जिल्हा बँकेने ८ हजार ४६३ शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटप केल्याने एवढे लाभार्थी या कर्जमापीस पात्र ठरले आहेत. यातील ७ हजार १२८ शेतकऱ्यांनी खावटी कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वीच कर्जमाफी अर्ज आॅनलाईन सादर केले होते.
खावटी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १३३५ शेतकरी अर्ज दाखल करण्याचे शिल्लक होते. १३३५ मधील ८४९ शेतकरी खावटी कर्जमाफीस पात्र ठरले होते. त्यातील ६६० शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. १८९ अर्ज दाखल होण्याचे शिल्लक राहिले आहेत. यातील १०५ मृत किंवा बाहेरगावी तर २५ नोकरदार किंवा पेन्शनर आहेत. ५९ शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कणकवलीत सर्वाधिक लाभार्थी
जिल्ह्यात एकूण खावटी कर्जमाफीस ८ हजार ४६३ पात्र ठरले आहेत. त्यात सर्वाधिक लाभार्थी २५४० एवढे आहेत. देवगड १७१०, मालवण ३८७, वैभववाडी ६९२, कुडाळ ९८७, वेंगुर्ले ६२०, सावंतवाडी १२३६, दोडामार्ग २९१ अशाप्रकारे लाभार्थी आहेत. यात कार्यवाही सुरु असणे किंवा मृत, बाहेरगावी, नोकरदार असल्याने देवगड २४, मालवण ३३, वैभववाडी १९, कणकवली २४, कुडाळ ५१, सावंतवाडी २९, दोडामार्ग ९ असे अर्ज भरणे शिल्लक असून वेंगुर्ले तालुक्यात सर्व अर्ज भरण्यात आले आहेत.