क्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 05:22 PM2019-11-02T17:22:50+5:302019-11-02T17:25:20+5:30
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली.
मालवण : गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. त्या पार्श्वभूमीवर देवगड, मालवण व वेंगुर्ले तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही मत्स्य विभागाकडून सुरू असून आतापर्यंत ७ कोटी ५२ लाखाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली.
ऐन मासेमारी हंगामात झालेल्या चक्रीवादळाने सिंधुदुर्गमधील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी जाळी वाहून गेली आहेत. काही मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या बोटींचे नुकसान झाले आहे. मासे सुकवणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर राज्य मत्स्य विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा मत्स्य विभागाकडून मच्छीमार नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या मच्छिमारांचे नुकसान झाले मात्र त्यांचे पंचनामे झाले नाही, अशा मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग कार्यालयाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मालवण परवाना अधिकारी श्रुती गावडे, देवगड परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, वेंगुर्ला परवाना अधिकारी चिन्मय जोशी यासह सागरी सुरक्षा रक्षक दलाचे दीपेश मायबा, सागर परब मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे किनारपट्टी गावात प्रत्यक्ष भेटी देऊन करत आहेत.
पंचनामे सुरूच असून अद्यापही काही किनारपट्टी गावातील पंचनाने पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे नुकसानीचा आकडा १० ते १२ कोटींचा पल्ला गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, क्यार वादळ संपून सुटकेचा नि:श्वास सोडेपर्यंत पुन्हा महाचक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.