‘कुडाळ’साठी ८० उमेदवार रिंगणात

By admin | Published: April 5, 2016 12:59 AM2016-04-05T00:59:34+5:302016-04-05T00:59:34+5:30

रवींद्र बोंबले यांची माहिती : ११ जणांची माघार; छाननीत आठ अर्ज अवैध

80 candidates for 'Kudal' in the fray | ‘कुडाळ’साठी ८० उमेदवार रिंगणात

‘कुडाळ’साठी ८० उमेदवार रिंगणात

Next

कुडाळ : येथील नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्यामध्ये शिवसेना १ व डमी म्हणून भरलेल्या काँग्रेसचा १ तसेच अपक्ष ९ उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीत काँग्रेस १७, शिवसेना १६, भाजप १४, मनसे ६ व अपक्ष २७ असे मिळून एकूण ८० उमेदवार १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिली.
यावेळी बोंबले म्हणाले, कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी होत आहे. येथे १७ जागांसाठी एकूण ९९ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी छाननीत ८ अर्ज अवैध ठरले. त्यानंतर राहिलेल्या ९१ उमेदवारांपैकी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
यामध्ये शिवसेनेच्यावतीने प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला इथून इम्रान करोल यांनी, तर ‘डमी’ म्हणून काँग्रेसमधून अर्ज भरलेल्या प्रभाग क्र. ७ डॉ. आंबेडकरनगरच्या उमेदवार सरिता कदम यांच्यासह प्रभाग क्र. १ कवीलकट्टामधून हेमंत मातोंडकर, प्रभाग नं. ३ लक्ष्मीवाडीमधून अपक्ष उमेदवार केदार काळप, वॉर्ड क्र. ६ गांधी चौकमधून जीवन मोहन बांदेकर, वॉर्ड क्र. ८ मधून अपक्ष उमेदवार अमिर सुहेल निसार शेख, वॉर्ड क्र. १० केळबाईवाडीमधून अपक्ष श्रीपाद कुडाळकर, वरुणेश्वर राणे, श्रीपाद कुडाळकर, महेश राऊळ, सिद्धेश नाईक व वॉर्ड क्र. १२ मधून वैशाली विजय नाईक, वरुणेश्वर विजय राणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
पोलिस बंदोबस्ताविषयी माहिती देताना बोंबले म्हणाले की, मतदानाच्या दिवशी पोलिस अधिकारी १२, पोलिस कर्मचारी ९८, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी.फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तर मतमोजणीच्या वेळी पोलिस अधिकारी ४, पोलिस कर्मचारी ५५, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी.फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे सांगितले.
पेड न्यूज, जाहिरातीसंदर्भातही समिती गठीत केली गेली असून यांच्या परवानगीशिवाय पेड न्यूज अथवा जाहिरात उमेदवाराने प्रकाशित केल्यास त्याबाबत समितीकडून छाननी करून तो अर्ज उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये आॅडिओ क्लिपही पकडण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण होत आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१७ मतदान केंद्रे
या निवडणुकीसाठी एकूण १२ हजार ६७ मतदार असून यामध्ये ६ हजार १२३ पुरुष, तर ५ हजार ९४४ महिला मतदार आहेत. मतदान केंद्र यादी ११ एप्रिलला प्रसिद्ध होणार असून एकूण १७ मतदान केंद्रे आहेत. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच याच ठिकाणी उमेदवारांनी आपला खर्च सादर करावयाचा आहे.
साहित्य वाटप
या मतदान काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांना तीन प्रशिक्षणे ठेवण्यात आली असून यापैकी पहिले प्रशिक्षण १ एप्रिल रोजी पार पडले. दुसरे प्रशिक्षण १२ व १६ एप्रिल रोजी होणार आहे. १६ तारखेला मतदान साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मतदान मोजणीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
७६ कर्मचारी
मतदान प्रक्रियेकरिता एकूण ७६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग एक अधिकारी ०२ , क्षेत्रिय अधिकारी ६, केंद्राध्यक्ष १९ , मतदान अधिकारी १९, कर्मचारी ३८ तसेच शासकीय आठ वाहने आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: 80 candidates for 'Kudal' in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.