ST Strike: सावंतवाडी एसटी आगारातील ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी, तुरळक सेवा सुरु
By अनंत खं.जाधव | Published: September 4, 2024 04:25 PM2024-09-04T16:25:20+5:302024-09-04T16:26:59+5:30
प्रवाशाचे हाल, बाजारपेठेवर मोठा परिणाम
सावंतवाडी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून ही त्याची कोणतीही दखल न घेण्यात आल्याने काल, मंगळवारपासून सुरू असलेला संप आज बुधवारी दुसऱ्या दिवशी कायम होता. सावंतवाडी एसटी आगारातील तब्बल ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने तुरळक एसटी सेवा सुरू होती. लांबच्या प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला.
सकाळच्या सत्रात अधिकाऱ्यांनी विनवणी करूनही चालक वाहक सेवेत रुजू झाले नसल्याने प्रवासी ही चांगलेच खोळंबले होते. सावंतवाडी एसटी आगार ठप्प झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपाचा सर्वात मोठा फटका हा सावंतवाडीला बसला असून जिल्ह्यातील इतर तालुक्यात तुरळक एसटी सेवा सुरू होत्या. काही कर्मचारी सेवेत रुजू असल्याने तालुक्यातील काही गावांमध्ये एसटी सेवा सुरू ठेवल्या. पण लांब पल्ल्याच्या गाड्यांना ब्रेक लागल्याने प्रवासी बस स्थानकात अडकून पडले होते.
उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनवणी केली पण कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू होण्यास नकार दिला. सावंतवाडी एसटी आगाराचे प्रमुख निलेश गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईकडे नेहमी १८ बसेस जातात पण सध्या १६ बसेस पूर्ण पणे बंद आहेत. शाळेच्या मुलांना ने आण करण्यासाठी काही कर्मचारी सेवेत आहेत.
बाजारपेठेवर मोठा परिणाम
एसटी सेवा ठप्प झाल्याने याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. गणेश चतुर्थीच्या तोंडावर संप पुकारल्याने बाजारपेठेत नागरिकांची लगबग कमी झाली. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मागे घेतला जावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.