सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचा तब्बल ९ कोटी ६५ लाखांचा निधी गेला मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 PM2021-06-04T16:09:16+5:302021-06-04T16:13:52+5:30
Zp Sindhudurg : क वर्ग तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेला २०१९-२० मध्ये प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख रूपयांपैकी ६ कोटी २३ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. तर ९ कोटी ६५ लाख रुपये निधी मागे गेला असल्याची माहिती झालेल्या वित्त समिती सभेत उघड झाली आहे. यावेळी सदस्य संतोष साटविलकर यानी मागे गेलेला निधी परत मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्राप्त निधी मागे जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
ओरोस : क वर्ग तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेला २०१९-२० मध्ये प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख रूपयांपैकी ६ कोटी २३ लाख रुपये निधी खर्च झाला आहे. तर ९ कोटी ६५ लाख रुपये निधी मागे गेला असल्याची माहिती झालेल्या वित्त समिती सभेत उघड झाली आहे. यावेळी सदस्य संतोष साटविलकर यानी मागे गेलेला निधी परत मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्राप्त निधी मागे जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या वित्त समितिची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी मदन भीसे, सदस्य अनघा राणे, गणेश राणे, संजय देसाई यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संतोष साटविलकर यानी जनसुविधा अंतर्गत क वर्ग तीर्थ क्षेत्र विकासासाठी किती निधी प्राप्त झाला ? किती खर्च झाला ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वित्त व लेखा अधिकारी भीसे यानी प्राप्त झालेल्या १५ कोटी ८८ लाख पैकी ६ कोटी २३ लाख खर्च झाल्याचे सांगितले. त्यावेळी सदस्य साटविलकर यानी निधी मागे का जातो ? असा प्रश्न उपस्थित केला. निधी मागे जाणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी घोडेमुख तीर्थ क्षेत्र येथे क वर्ग अंतर्गत पर्यटन विकासासाठी निधी प्राप्त झाला होता. परंतु तेथील जमीन वन विभागाच्या ताब्यात असल्याने हे काम रद्द करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाने सांगितले. तसेच मोंडपार ग्रामपंचायत येथे डाटा ऑपरेटर नियुक्त करा. यासाठी ग्रामपंचायतने आगाऊ दिलेल्या निधितून नियुक्त डाटा ऑपरेटरला मानधन दिले जाईल, असेही ग्रामपंचायत विभागाने कळविले आहे.
आशा स्वयंसेविका तूटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यांचे कोरोना काळात मोलाचे योगदान लाभत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना मानधन वाढवून देण्यासाठी पर्याय सूचवावा, अशी सूचना संजय देसाई यानी केली. तसेच मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिल्लक बिल अदा करु नये, अशीही सूचना करण्यात आली.
२०२०-२१ चा खर्च केवळ ६७ टक्के
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचे स्वनिधी बजेट २१ कोटी ३५ लाख एवढे होते. यातील मार्च २०२१ अखेर केवळ १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ७४ रुपये खर्च झाले आहेत. ६७ टक्के हा खर्च आहे. त्यामुळे उर्वरीत निधी मागे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.