९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत
By admin | Published: May 29, 2016 12:26 AM2016-05-29T00:26:06+5:302016-05-29T00:28:54+5:30
एक लाखाचे अनुदान : खेळाडू निर्मितीत मोठी अडचण
रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९८ प्राथमिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. तब्बल ९० टक्के शाळांमध्ये क्रीडांगणे नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खेळाडू निर्माण होण्यास ही मोठी अडचण ठरत आहे. तरीही शिक्षकवर्गाकडून खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण २७८६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक (इयत्ता १ ते ४) १६७८, उच्च माध्यमिक (इयत्ता १ ते ७ ते ४ ते ७) १०९९ व माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गतवर्षी शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल शासनाला सादर केला होता.
या अहवालानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करुन ती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पायाभूत भौतिक सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. त्यामध्ये अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली असणेही आवश्यक आहे.
पूर्वी क्रीडांगणाचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या होते. त्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शाळा दिसत आहेत. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील शेतांच्या मळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. (शहर वार्ताहर)