शिक्षक पतपेढीसाठी ९७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 10:58 PM2016-08-21T22:58:33+5:302016-08-21T22:58:33+5:30

आज निकाल : १५ जागांसाठी ३२ उमेदवार

95 percent polling for teacher's credit | शिक्षक पतपेढीसाठी ९७ टक्के मतदान

शिक्षक पतपेढीसाठी ९७ टक्के मतदान

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २९८२ मतदारांपैकी २९०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ९७.३५ टक्के मतदान झाले. १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून त्यांचे भवितव्य रविवारी मतदानपेटीत बंद झाले आहे. मतदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील मतदारबुथवर शांततेत मतदान पार पडले. रविवारी आठ तालुक्यांच्या मतदानकेंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात दुपारी २.३० वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. या निकालानंतर भाग्यलक्ष्मी पॅनेल सलग चौथ्यांदा बाजी मारते की परिवर्तन पॅनेल परिवर्तन घडवते हे काही तासातच स्पष्ट होणार आहे.
या पतपेढीच्या एकूण १७ जागा असून यातील १५ जागा निवडून द्यायच्या आहेत. यासाठी ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ३९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. पतपेढीचे विद्यमान सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत. या पॅनेलमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटना सहभागी आहेत, तर त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनेल आपली ताकद पणाला लावून नशीब अजमावित आहे. भाग्यलक्ष्मी पॅनेलच्या विरोधात अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख शिक्षक संघ, सिंधुदुर्ग कास्ट्राईब कल्याण प्राथमिक शिक्षक संघटना, अल्पसंख्याक उर्दू संघटना या सहा संघटना विरोधात उतरल्या आहेत. या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत असतानाच मालवण तालुका मतदारसंघातून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलमधील प्रमुख संघटना असणाऱ्या शिक्षक समितीचे विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष पाताडे यांनी पॅनेलचे अधिकृत उमेदवार राजेंद्रप्रसाद गाड यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिक्षक समितीने पाताडे यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे. जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून सावंतवाडी येथील लक्ष्मीकांत कराडे हे आपले नशीब अजमावित आहेत. या दोन जागांसाठी एकास तीन उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित अकरा जागांवर एकास एक उमेदवार आहेत, तर जिल्हा सर्वसाधारण व महिला सर्वसाधारण या दोन जागांसाठी दोन्ही पॅनेलचे दोन दोन मिळून चार उमेदवार रिंगणात आहेत.
कोठून कोण उमेदवार लढला?
तालुका मतदारसंघात वैभववाडीतून दिनकर केळकर (भाग्यलक्ष्मी), संतोष मोरे (परिवर्तन), कणकवली - गिल्बर्ट फर्नांडिस (भाग्यलक्ष्मी), दत्तात्रय सावंत (परिवर्तन), देवगड - जगदीश गोगटे (भाग्यलक्ष्मी), लक्ष्मण घोटकर (परिवर्तन), मालवण - राजेंद्रप्रसाद गाड (भाग्यलक्ष्मी), संतोष पाताडे (अपक्ष), शिवराज सावंत (परिवर्तन), कुडाळ - नामदेव जांभवडेकर (भाग्यलक्ष्मी), राजाराम कविटकर (परिवर्तन), वेंगुर्ला - त्रिंबक आजगावकर (भाग्यलक्ष्मी), एकनाथ जानकर (परिवर्तन), सावंतवाडी -नारायण नाईक (भाग्यलक्ष्मी), प्रमोद पावसकर (परिवर्तन), दोडामार्ग - सुधीर दळवी (भाग्यलक्ष्मी), आत्माराम देसाई (परिवर्तन), जिल्हा मतदारसंघातील जिल्हा सर्वसाधारणच्या दोन जागांसाठी विठ्ठल गवस, अनंत राणे (भाग्यलक्ष्मी), किशोर कदम, संजय कदम (परिवर्तन), महिला सर्वसाधारण दोन जागांसाठी मृगाली पालव व रुचिता कदम (परिवर्तन), स्नेहलता राणे, नीलम पावसकर (भाग्यलक्ष्मी), जिल्हा अनुसूचित जाती जमाती - आनंद तांबे (भाग्यलक्ष्मी), हरिभाऊ निसरड (परिवर्तन), जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग महेंद्र लांबोर (परिवर्तन), नंदकिशोर गोसावी (भाग्यलक्ष्मी), लक्ष्मीकांत कराड (अपक्ष), जिल्हा इतर मागास - दिनकर तळवणेकर (भाग्यलक्ष्मी), परेश तेली (परिवर्तन) अशाप्रकारे निवडणूक रिंगणात असलेल्या ३२ उमेदवारांचे पतपेढीचे संचालक बनण्याचे स्वप्न रविवारी मतदानपेटीत बंद झाले आहे.

कोठे किती मतदान झाले?
कणकवली तालुक्यातील मतदारांसाठी भालचंद्र महाराज मठानजीकच्या शाळा क्र. ३ येथे, तर उर्वरित सात तालुक्यांतील मतदारांसाठी त्यांच्या तालुक्याच्या तालुका स्कूल येथे मतदानकेंद्र ठेवण्यात आले होते. त्यानुसार सावंतवाडी ४९० पैकी ४७९, वेंगुर्ला २३६ पैकी २३५, मालवण ३४४ पैकी ३३३, कणकवली ५४१ पैकी ५३१, देवगड ३९२ पैकी ३६८, वैभववाडी २०८ पैकी २०७, कुडाळ ५८४ पैकी ५६५, दोडामार्ग १८७ पैकी १८५ अशाप्रकारे तालुकानिहाय प्राथमिक शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात वेंगुर्ला व वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.

Web Title: 95 percent polling for teacher's credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.