मोठी दुर्घटना! तारकर्ली येथे २० पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, दोघेजण बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 02:53 PM2022-05-24T14:53:35+5:302022-05-24T17:13:12+5:30
Boat Drown in Tarkarli : या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग : देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बोट समुद्रात उलटून अपघात झाला आहे. जय गजानन नावाच्या या बोटीत तब्बल २० पर्यटक होते. त्यातील दोघे पर्यटक बुडल्याची माहिती मिळत असून काही पर्यटक गंभीर जखमी आहेत. या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.
या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. स्थानिक पोलीस अधिकारी तसेच महसूलची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना ही देण्यात आली आहे. काही वेळातच माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः मालवण येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ही हलविण्यात येणार आहे.
तारकर्ली येथे २० पर्यटकांनी भरलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटली, जखमी आणि मृतांची नावे खालीलप्रमाणे pic.twitter.com/mYYwjHhOsm
— Lokmat (@lokmat) May 24, 2022
सिंधुदुर्ग जिल्हा- ग्रामीण रूग्णालय, मालवण यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे जय गजानन नावाची पर्यटकांना घेवून जाणारी बोट आज दुपारी 12.30 वाजता चे दरम्यान MTDC रिसॉर्ट, मालवण येथे बोट किनाऱ्यावर आणत असताना बुडाली. या बोटीत 20 पर्यटक होते. त्यापैकी 2 पर्यटक मृत झाल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय मालवण यांचेकडून प्राप्त झालेली आहे. उर्वरीत 18 पर्यटक तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत. सद्यःस्थितीत बोटितील सर्व पर्यटक सापडले असून बेपत्ता पर्यटकांची संख्या शून्य आहे. अशी माहिती पोलीस पाटील देवबाग यांचेकडून मिळालेली आहे.