वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:47 PM2022-02-04T14:47:58+5:302022-02-04T14:48:19+5:30
हे पाचजण मुंबईहून गोव्याला निघाले होते
वैभववाडी(सिंधुदुर्ग): मुंबईहून गोव्याकडे निघालेली कार ५० फूटांवरुन नदीत कोसळली. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदीच्या पुलावर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात येणार आहे.
आदेश सरोदे (वय-२४), विनय भालचंदानी (२८), विकास भालचंदनी (३२), आरती भालचंदानी (३४) अशी अपघातील जखमींची नावे आहेत.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला हे पाचजण निघाले होते. एडगाव येथील शुकनदीच्या पुलावर जवळ येताच कार रस्ता सोडून नदीत कोसळली. नदीकाठच्या झुडपांतून कार खाली कोसळल्याने तसेच कारमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कार नदीत कोसळल्याची माहिती कळताच पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस अपघातस्थळी पोहोचताच कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु केले. त्यासाठी जमलेल्या नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले. जखमींना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापूरला नेण्यात येणार आहे.