सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडांसह वानरांची होणार प्रगणना
By अनंत खं.जाधव | Published: May 23, 2024 09:20 PM2024-05-23T21:20:42+5:302024-05-23T21:21:22+5:30
वनविभागाकडून प्रथमच उचलण्यात आले पाऊल : तीनशे जणांना देण्यात येणार प्रशिक्षण.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हात होत असलेला माकड व वानर याचा उपद्रव रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभाग माकड व वानर यांची शास्रोक्त पद्धतीने प्रगणना करणार असून यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक अशा तीनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण गुरूवार पासून सुरू होणार आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील माकड व वनर यांच्या उपद्रवामुळे फाळबागायती व शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड व वानर निर्मिती निर्बीजीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या अध्यक्षतेखाली जलद कृती दल ची निर्मिती कारण्यात आलेली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हात माकड व वानर यांची शास्रोक्त पध्दतीने प्रगणना करणे व त्यांच्या संख्येत झालेली वाढ नोंदविण्यात येणार आहे.
सावंतवाडी वन विभागातील वन अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक असे जवळजवळ ३०० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षक म्हणून तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील डॉ. एच.एन. कुमारा हे येणार आहेत. तर २५ मे पासून ही प्रगणना प्रत्यक्षात जिल्हाभर पार पाडण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हात प्रथमच माकड व वानर यांची प्रगणना होणार असून यात वनविभाग कितपत यशस्वी होणार हे बघावे लागणार आहे.या प्रगणने बाबत वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी माहिती दिली असून ही प्रगणना यशस्वी होईल असा दावा त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.