कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली
By सुधीर राणे | Published: October 21, 2022 06:47 PM2022-10-21T18:47:55+5:302022-10-21T18:48:21+5:30
पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कणकवली: गेले चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकानजीक वीज कोसळली. प्लॅटफॉर्म नंबर एकच्या ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण सततच्या विजांच्या गडगटाने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
कणकवली रेल्वे स्टेशन येथील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दिवाळीमुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच दरम्यान मोठा गडगडाट करीत नजिकच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली.
काल, गुरुवारी सायंकाळी कनेडी येथे वीज पडून आठ महिला जखमी झाल्या होत्या. तर काही दिवसापूर्वी साळीस्ते येथील एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अचानक पडणाऱ्या पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.