कणकवली पर्यटन महोत्सवात संस्कृती, परंपरेचा मिलाफ, शोभयात्रेतील चित्ररथ ठरले लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:30 PM2023-01-06T12:30:14+5:302023-01-06T12:30:34+5:30

शोभायात्रेने कणकवली गजबजली

A combination of culture, tradition in Kankavali tourism festival | कणकवली पर्यटन महोत्सवात संस्कृती, परंपरेचा मिलाफ, शोभयात्रेतील चित्ररथ ठरले लक्षवेधी 

कणकवली पर्यटन महोत्सवात संस्कृती, परंपरेचा मिलाफ, शोभयात्रेतील चित्ररथ ठरले लक्षवेधी 

googlenewsNext

कणकवली: कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शोभयात्रेत भारतीय संस्कृती, परंपरा यांचा अनोखा मिलाप दर्शविणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. त्या चित्ररथांना अनुरूप गाण्यांचा ठेका, सजवलेल्या बैलगाड्यांमध्ये विविध दशावतारी देखावे अशा भारलेल्या वातावरणात भव्य शोभायात्रेने गुरुवारी सायंकाळी कणकवली पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.

शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर मुख्य रंगमंचावर केंद्रीयमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली पर्यटन महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. 

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पुढाकारातून कणकवली पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर होणार्‍या या महोत्सवानिमित्त श्रीधर नाईक चौकापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उदघाटन प्रसंगी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश सावंत, रोटरीचे गौरेश धोंड, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी उपस्थित होते. 

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटना पूर्वी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली.या शोभयात्रेचा शुभारंभ डॉ. गुरुदास कडुलकर यांच्या हस्ते श्री पटकीदेवी मंदिराकडे करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नलावडे, आशिष वालावलकर,  सिंधुगर्जना ढोल पथकाच्या साथीने श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मंडळे या शोभायात्रेत सहभागी झाली होती. त्यांनी आकर्षक चित्ररथ तयार केले होते. या चित्ररथांची स्पर्धाही घेण्यात आली. त्यांचे परिक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. 

लक्षवेधी आकर्षक चित्ररथ

प्रभाग १ शिवराज्याभिषेक सोहळा,प्रभाग क्रमांक २ ने छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले हा चित्ररथ, प्रभाग क्रमांक १३ नेहरूनगर, बीजलीनगर यांनी' आपली संस्कृती,आपली परंपरा' या विषयावरील चित्ररथ, प्रभाग ६ गरुडावर बसलेले श्री विष्णू,प्रभाग ९  विठ्ठल दर्शन, प्रभाग ५ श्री शिवशंकर,प्रभाग १५ शिव शंकराचे विराट रूप,प्रभाग ३ भारत माता,प्रभाग ४ बारा ज्योतिर्लिंग,प्रभाग ७ वासुदेव,प्रभाग १४ श्री दुर्गादेवी,प्रभाग १०बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तू,सावंतवाडी माठेवाडा मित्रमंडळ यांनीही आकर्षक चित्ररथ तयार केले होते.

बैल गाड्या व बैलांना सजवून त्या शोभायात्रेत सहभागी करण्यात आल्या होत्या.  त्यामध्ये कासरल येथील सिध्देश परब, हरकुळ बुद्रुक येथील भाई ठाकूर, कणकवली मधलीवाडी येथील अवधूत राणे, बाळा करंबेळकर,निम्मेवाडी येथील प्रशांत साटम, हरकुळ बुद्रुक येथील पांडुरंग सापळे आदींचा समावेश होता.

शोभायात्रेने कणकवली गजबजली

विविध प्रकारचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्ता दुतर्फा गर्दी केली होती. सिंधुगर्जना ढोलपथकाने शानदार ढोलवादन केले. या शोभायात्रेत कार्टूनच्या वेशभूषा केलेले कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभायात्रेने कणकवली दूमदूमून गेली होती.

Web Title: A combination of culture, tradition in Kankavali tourism festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.