सिंधुदुर्ग: वागदे येथे कंटेनरची समोरुन येणाऱ्या कारला भीषण धडक, कार चालक जागीच ठार
By सुधीर राणे | Published: August 26, 2022 04:25 PM2022-08-26T16:25:34+5:302022-08-26T16:26:01+5:30
धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
कणकवली: महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणार्या कंटेनरची समोरून येणाऱ्या कारला वागदे येथे जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. प्रशांत प्रभाकर सावंत (वय-४७, नरडवे, सध्या रा. कणकवली) असे मृत कार चालकाचे नाव आहे. कणकवली येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत महामार्गाची एक लेन बंदावस्थेत आहे. येणारी - जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. या अपघातालाही महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, विलास गावकर, बाबू सावंत, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.