Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:09 PM2024-06-22T12:09:07+5:302024-06-22T12:09:30+5:30
पावसाचा जोर वाढल्याने खबरदारीचे आवाहन
वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात शुक्रवार, २१ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, तालुक्यात सायंकाळी पावसाचा जोर किंचित वाढला आहे.
मुसळधार पावसाने गुरुवारी तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार झाले. कुसूर येथे झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात तुरळक हलक्या स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. दुपारनंतर भुईबावडा आणि करुळ घाट परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली.
दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, दरडीमुळे वाहतूक ठप्प झालेली नाही. एकेरी वाहतूक सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्यात आली नव्हती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला, त्यामुळे घाटमार्गाने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.