Sindhudurg: शेताकडे गेलेला शेतकरी बेपत्ता, पियाळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती
By सुधीर राणे | Published: July 18, 2024 04:32 PM2024-07-18T16:32:05+5:302024-07-18T16:32:49+5:30
तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी घटनास्थळी दिली भेट
कणकवली: कणकवली तालुक्यातील असलदे दिवाणसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर (वय-७८) काल, बुधवारी सायंकाळी शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. मात्र, अद्यापही ते घरी परतलेले नाहीत. दरम्यान, त्यांची छत्री शेती लगत असलेल्या पियाळी नदीकाठी आढळून आल्याने पुराच्या पाण्यात ते वाहून गेल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
धाकू मयेकर यांची छत्री घरापासून जवळ असलेल्या असलदे दिवाणसानेवाडी पियाळी नदीच्या काठावर आढळून आली. त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक सकाळीच दाखल झाले होते. असलदे गावातील ग्रामस्थांनी बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी नदीलगत शोधमोहीम राबवली. मात्र अद्यापही धाकू मयेकर यांचा शोध लागला नाही. प्रशासनातर्फे शोधकार्य सुरु आहे. समीर जगन्नाथ मयेकर (रा.बावशी, गावठणवाडी) यांनी याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलिस उपनिरिक्षक राजकुमार मुंडे, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी अध्यक्ष भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , मंडल अधिकारी ए.आर.जाधव, तलाठी प्रविण लुडबे, पोलिस पाटील आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.