सिंधुदुर्गातील आशिये माळरानाला लागली आग, अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात
By सुधीर राणे | Published: March 10, 2023 05:55 PM2023-03-10T17:55:24+5:302023-03-10T17:55:42+5:30
आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही
कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये व कलमठ गावच्या सीमेवरील माळरानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. रणरणत्या उन्हात साधारणपणे दीड ते दोन किलोमीटरचा परिसरात आगीचा वेढा होता. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.
आशिये आणि कलमठ गावच्या सीमेवर असलेल्या मैदानावर संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सुरळीतपणे सुरू असताना अचानक आग लागली. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र, तेथील आजूबाजूकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता.
कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री आणि भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी आजूबाजूच्या परिसरातील बागायतींचा विचार करून तातडीने कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. उपस्थित नागरीकांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली.