सावंतवाडीत चोरट्याचा धुमाकूळ; तीन प्लॅट फोडले, दागिन्यासह रोख रक्कम लांबवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:41 AM2023-05-30T08:41:19+5:302023-05-30T08:41:41+5:30
याप्रकरणी परिसरात संशयास्पद दिसलेल्या दोघा परप्रांतीय युवकांना सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर परिसरात अज्ञात चोरट्याने सैनिक चंद्रशेखर वासुदेव पारधी यांच्यासह अन्य तिघांचे प्लॅट फोडले. यात दोन घरातील रोख रक्कमेसह सोन्या, चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. दरम्यान याप्रकरणी परिसरात संशयास्पद दिसलेल्या दोघा परप्रांतीय युवकांना सावंतवाडीपोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार सैनिक चंद्रशेखर पारधी यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की, पारधी हे सैन्य दलात कार्यरत असून ते सद्यस्थितीत सुट्टीवर आले आहेत. ते सर्वोदय नगर परिसरात राहतात २७ तारखेला ते आपल्या येथील मूळ वेर्ले गावात कार्यक्रम असल्यामुळे ते आपला भाऊ पबी याच्यासह त्या ठिकाणी गेले होते. दरम्यान आज ते घरी आले असता त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.
यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना घेऊन खात्री केली असता घरातील असलेल्या लाकडी कपाटातील २० हजार रुपये रोख आणि कुडी व झुमके असे अंदाजे १५ हजाराची सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.तक्रार त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान त्यांच्या बाजूला राहणाऱ्या शुभांगी नामदेव गोवेकर यांच्या घरातील कपाट तोडून चांदीची जोडवी आदी साहित्य अज्ञात चोरटाने लंपास केले आहे. तर पारधी यांचे सख्खे भाऊ पबी यांच्या घरातही चोरी करण्याचा चोरट्याने प्रयत्न केला आहे.
या तिन्ही चोरी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंत हे करीत आहेत. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. दरम्यान त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात फिरणाऱ्या दोघा अज्ञात परप्रांतीय युवकांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मात्र मिळू शकली नाही.