डिंगणे-बांबरवाडीत भर दिवसा काजू बागेत गव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:30 PM2022-02-18T17:30:58+5:302022-02-18T17:31:24+5:30
काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत.
बांदा : डिंगणे-बांबरवाडी येथे भर दिवसा काजू बागेत गव्या रेड्यांचा कळप दृष्टीस पडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी विलास मांजरेकर यांच्या काजू बागेत तब्बल १५ हुन अधिक गव्यांच्या कळपाचा वावर होता.
काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत. आज नेहमीप्रमाणे मांजरेकर हे डिंगणे-बांबरवाडी येथील आपल्या काजू बागेत काजू बी गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तब्बल १५ हुन गव्यांच्या कळपाचा बिनधास्त वावर असल्याचे दिसून आले.
त्यांनी प्रसंगावधान दाखवत गव्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र गव्यांची संख्या अधिक असल्याने त्यांनी बागायतीतून काढता पाय घेतला. भर दिवसा गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजू हंगाम सुरुवात झाल्याने गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार देखील भविष्यात होऊ शकतात. यासाठी या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सायंकाळी उपसरपंच जयेश सावंत, बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी काजू बागायतीत जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या.
डिंगणे गावात जंगलमय भागात गव्यांची संख्या ही प्रचंड वाढली आहे. बांदा-डिंगणे रस्त्यावर देखील कित्येकदा भर दिवसा गव्यांचा कळप दृष्टीस पडला आहे. कित्येकवेळा हे गवे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे देखील जीवावर बेतणारे ठरू शकते.