video..अन् अचानक कार समोर आला महाकाय टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:52 AM2022-06-23T11:52:54+5:302022-06-23T12:28:07+5:30
सावंतवाडीतील युवकांनी मोबाईलमध्ये केले चित्रीकरण
सावंतवाडी : बेळगाव-सावंतवाडी राज्यमार्गावर आंबोली नांगरतास रस्त्यावर अचानक महाकाय टस्कर कार समोर आला. सावंतवाडीतील डॉ. अनिष स्वार आणि उद्योजक आसिफ शेख यांना भर रस्त्यात टस्करचे दर्शन झाले. त्यांनी हा थरारक प्रसंग मोबाईलमध्ये टिपला आहे. अचानक कार समोर आलेला टस्कर हत्ती पाहून दोघेजण भेदरले. परंतू मागून येणा-या अन्य एका गाडीचा प्रकाश पडल्यामुळे टस्कर झुडपात गेला.
ही घटना काल, बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती खुद्द डॉ. स्वार यांनी दिली आहे. डॉ. स्वार काही कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले होते तेथून परताना हा महाकाय टस्कर त्यांच्या कार समोर आला. अचानक हत्तीचे दर्शन झाल्यामुळे हा थरारक अनुभव होता असे स्वार यांनी सांगितले. दरम्यान रात्रीच्या वेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रवाशांनी आवश्यक ती काळजी घ्यावी योग्य ती खबरदारी घेऊन वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी असेही ते म्हणाले.
गेली ६ ते ७ वर्षे हा टस्कर आंबोली नांगरतास आजरा परिसराच्या भागात स्थिरावला आहे. अधून मधून नागरिकांनी टस्कर दिसतो. बऱ्याच वेळा उसाचे नुकसान करतो. तर उन्हाळ्यात त्याच्या जोडीला आणखी ४ जणांचा कळप वर्षभरात कधीतरी आठवडा भर जोडीला येतो असे चित्र काही वर्षे दिसते आहे. १५ दिवसापूर्वी नांगरतास भागात टस्कर दिसला होता. एका शेतक-याच्या ऊसाचे नुकसान केले होते. त्यानंतर तो घाटात गेल्याने हा टस्कर कोकणात खाली उतरला तर त्याठिकाणी माड पोफळीचे नुकसान करू शकतो. असे असले तरी गेली ६-७ वर्षे मात्र आंबोली नांगरतास भागातच मात्र तो अधून मधून दिसतो.
..अन् अचानक कार समोर आला टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरीhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/qVGEe87CcT
— Lokmat (@lokmat) June 23, 2022
कारचा केला होता चक्काचूर
कासार कांडगाव (ता. आजरा) येथे (दि.१७ जून) टस्करने नारायण देसाई यांची चारचाकी गाडी उलटून टाकून चक्काचूर केली होती. तर मारुती हरेर यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान केले होते.