सावधान, सह्याद्रीचा बुरूज ढासळतोय; नाटळ गावातील पूर्वेकडचा काही भाग कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:42 PM2024-09-27T15:42:58+5:302024-09-27T15:45:31+5:30
मिलिंद डोंगरे कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने ...
मिलिंद डोंगरे
कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला असल्याने येथील नजीक असलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे झालेल्या घटनेच्या स्मरणाने पुन्हा एकदा प्रत्येकाच्या हृदयात धडकी भरली आहे.
नाटळ गावाला तिन्ही बाजूला डोंगररांगांचे एक प्रकारचे संरक्षणच लाभले आहे. परंतु हेच संरक्षण जेव्हा काळ बनून समोर उभे ठाकते तेव्हा मात्र हृदयाचे पाणी पाणी होते. गावाच्या पूर्वेला मोठा डोंगर पसरला आहे. गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर बॉर्डर सुरू होते. या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा धरणाचे पाणी पसरले आहे. या धरणाचे पाणी कित्येक वर्षे या डोंगर भागात मुरत आहे.
डोंगराचे भूस्खलन होण्याचा धोका
उन्हाळ्यातही या डोंगर भागात पाणी असते. दिवसेंदिवस पाणी मुरण्याची क्षमता वाढत असल्याने या डोंगरांचे भूस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. यावर वेळीच उपाययोजना शासनस्तरावर होणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखा प्रसंग घडायला वेळ लागणार नाही.
२५ ते ३० मीटर रुंदीचा भाग कोसळला
यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून फळसाचा माळ या ठिकाणचा डोंगर कोसळला. कोसळलेला भाग खाली राहत असलेले नामदेव सावंत व त्यांचे भाऊ यांच्या घरांपासून एकदम जवळच आहे. मध्ये नदी असल्याने कोसळलेल्या भागाची माती, दगड हे थेट नदीपात्रात आले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सुमारे २५ ते ३० मीटर एवढ्या रुंदीचा भाग व अडीचशे ते ३०० मीटर एवढ्या उंचीचा भाग खाली कोसळला आहे.
शासनस्तरावर उपाययोजनांची गरज
काही वर्षांपूर्वी या डोंगर भागात बहुतांश वेळा छोटे-छोटे भूस्खलन झालेले आहे. निसर्गानेही एक आपल्या रौद्र रुपाची झलक दाखवली आहे. भविष्यात होणाऱ्या अशा नैसर्गिक संकटांपासून येथील ग्रामस्थांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.
ग्रामस्थांना नोटिसा, विमा उतरविण्याचे आवाहन
दोन वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळून दुर्घटना घडली होती. यात एक घर जमिनीखाली गाडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक जण जायबंदी झाला होता. याची दखल घेत शासनाच्यावतीने सह्याद्री पट्ट्यांतील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांच्या डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला होता. या गावांतील डोंगर भागांपासून नजीक असलेल्या ग्रामस्थांना त्यावेळी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. या नोटिसांमध्ये येथील ग्रामस्थांनी त्वरित आपापल्या घरांचा विमा उतरविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थांच्या जीविताच्या सुरक्षिततेसंबंधी यात काहीही उल्लेख नव्हता. त्यावेळी तत्काळ शासनस्तरावर डोंगर भागांचा सर्व्हे करण्यात आला; परंतु त्याचा अहवाल मात्र अद्याप आलेला नसल्याचे चौकशी अंती समजते.
कळंबा धरणाचे पाणी हे येथे कित्येक वर्षे मुरत असल्याने माती ढिली होऊन हे डोंगराचे भाग भविष्यात कोसळणारच आहेत. आम्ही जंगल भागात फिरत असताना बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झाल्याचे पाहिले आहे. भविष्यात हे धोकादायक आहे. -गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी