Sindhudurg: फोंडाघाटात पोलिसांच्या कारला खासगी बसची जोरदार धडक, चौघेजण जखमी
By सुधीर राणे | Published: June 3, 2024 04:09 PM2024-06-03T16:09:44+5:302024-06-03T16:10:33+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली
कणकवली : ओरोस येथून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या सिंधुदुर्गपोलिसांच्या (क्रमांक एम.एच.०७ जी.२२४२) या चारचाकी गाडीला कोल्हापूरवरून येणाऱ्या खासगी बस (क्रमांक एम.एच. ०४ के.यू. ०७१६) ची धडक बसून फोंडाघाट येथे अपघात झाला. या अपघातातपोलिसांच्या गाडीच्या चालक तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात आज, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला.
फोंडाघाट येथील मुख्य धबधब्याजवळील तीव्र वळणावर हा अपघात झाला. या अपघातात चालक तृप्ती मुळीक, पोलिस हवालदार पाडळकर, नितीन कदम, निवतकर हे चौघेजण जखमी झाले आहेत. अपघातात पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच फोंडाघाट येथील ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तृप्ती मुळीक यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.