..तरच लोकशाही टिकेल, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
By अनंत खं.जाधव | Published: October 1, 2022 04:13 PM2022-10-01T16:13:49+5:302022-10-01T16:14:23+5:30
महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले.
सिंधुदुर्ग: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
वेंगुर्ले येथे बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ.नाथ पै याची नात आदिती पै, शैलेंद्र पै, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ.नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, व्हिक्टर डॉन्टस अमित सामंत,अर्चना घारे-परब, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, संजय पडते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, बॅ..नाथ पै लहान कुटुंबात जन्माला आले होते. वडिलांचे छत्र लहान पणीच हरपले. आईने छोटी मोठी कामे करून या सात भावंडाना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले तेथे त्यांनी स्वातंत्र संग्रामात भाग घेतला आणि तेथूनच बॅ.नाथ पै यांच्या कामाची सुरूवात झाली. त्याचे सुरूवातीचे आयुष्य पूर्ण पणे संर्घषातून गेले. नंतर पुढे ते इंग्लंडला गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले पण पराभूत झाले. पण ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रीय सहभाग घेतला. राजापूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आज ही आपण पुस्तक रुपाने वाचत आहोत.
बॅ.नाथ पै यांचे विचार ऐकण्यासाठी पंडित नेहरू स्वता थांबत
बॅ.नाथ पै यांचे संसदेतील विचार ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही हे स्वता थांबायचे. ते टिका करायचे पण टीकेत व्यक्तिगतपणा नव्हता, समृद्ध लोकशाही प्रणाली टिकण्यासाठी मार्गदर्शन होते असेही पवार म्हणाले.
शरद पवार सर्वांचे प्रेरणास्थान - केसरकर
मंत्री केसरकर म्हणाले, शरद पवार हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. बॅ.नाथ हे समाजवादी विचारसरणीचे होते. समाज उन्नतीसाठी ते नेहमी काम करायचे. बॅ.नाथ पै यांच्या स्मृती कायम राहिल्या पाहिजेत. माझ्या राजकीय जडण घडणीत पवार यांचा मोलाचा वाटा असून शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकवल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.
बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा अभिमान - राऊत
खासदार राऊत म्हणाले, मी संसदेत असतो तेव्हा मला मला बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच या मतदारसंघाला परंपरा आहे. त्यामुळे मतदार संघाला कुठे ही गालबोट लागू नये म्हणून माझा प्रयत्न असतो. बॅ.नाथ पै याची गाजलेली भाषणे आम्हाला पुस्तकांतून अनुभवायला मिळावीत यासाठी लवकरच संसदेतील भाषणे पुस्तक येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विठ्ठल याळगी यांनी नाथ पै यांच्या आठवणी जागवल्या. कधी ही त्याच्यात बडेजाव नाही. त्यांना जंगलात शिकारीची आवड होती. 1960 सालीच बॅ.नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न बघितल्याचे त्यांनी सांगितले. ते नंतर सत्यात उतरले. महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले. यावेळी आदिती पै यांच्यासह आमदार बाळाराम पाटील यांनी ही आपले विचार मांडले.