मंजूर झालेली मशीन मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 12, 2024 06:41 PM2024-02-12T18:41:52+5:302024-02-12T18:42:10+5:30

अधिकारी एक तासाने कार्यालयात परतले

A protest was held at the Khadi Village Industry Office to get the approved machine | मंजूर झालेली मशीन मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन

मंजूर झालेली मशीन मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग : खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन मंजूर असतानाही ती देण्यास टाळाटाळ होत आहे. घे भरारी महिला बचतगट कवठी या गटाच्या सदस्या साक्षी सुभाष जोशी यांनी सोमवारी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान या बचत गटांबाबत तक्रार आली असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे कार्यालयाचे अधिकारी उदय मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कुडाळ तालुक्यातील कवठी गावातील ‘घे भरारी महिला बचत गटाने’ खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षण पूर्ण होताच या बचत गटाच्या महिलांना उमेदमार्फत प्रमाणपत्रही देण्यात आली. त्यानंतर या बचतगटाला कोकम सरबत तयार करणारी मशीन मंजूर झाली होती. त्याची २५ टक्के रक्कमही या बचत गटाने भरली आहे.

मात्र असे असतानाही या बचतगटाला मशीन देण्यास टाळाटाळ होत असल्याने या बचत गटाच्या महिलांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयाशी संपर्क साधला असता आपल्याला मशीन मंजूर असून लवकरच त्याचे वितरण केले जाईल, असे कार्यालय प्रमुख मराठे यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. त्यात शनिवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या कार्यक्रमात या मशीनचे उर्वरित बचतगटांना वाटप करण्यात आले आहे. मात्र आपल्या बचतगटाला देण्यात आली नाही, असे बचत गटाच्या सदस्या साक्षी जोशी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान साक्षी जोशी यांनी कार्यालयात येत चौकशी केली असता अधिकाऱ्याकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने आणि आपल्याला मशीन देण्यास टाळाटाळ होत असल्याने साक्षी जोशी यांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयातच ठिय्या आंदोलन छेडले. जो पर्यंत मशीन दिली जात नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला.

अधिकारी एक तासाने कार्यालयात परतले

साक्षी जोशी यांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यावर संबंधित कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी कार्यालयाबाहेर गेले. ते तब्बल एक तासाने कार्यालयात परतले असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्या जोशी यांनी सांगितले.

Web Title: A protest was held at the Khadi Village Industry Office to get the approved machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.