रांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 01:27 PM2023-07-11T13:27:43+5:302023-07-11T13:28:06+5:30

आंबोलीमधून सर्वप्रथम या सापाचा शोध लागला

A rare non venomous Moss water snake was found in Ranganagarh | रांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप

रांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप

googlenewsNext

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप आढळून आला. प्राणीमित्र अनिल गावडे, वन्यजीव अभ्यासक गौतम कदम, वैभव अमृस्कर, दिवाकर बांबार्डेकर, प्रसाद गावडे, ओमकार गावडे, शुभम फाटक यांना बुधवार रात्री ट्रेकिंगदरम्यान या सापाचे दर्शन झाले. शेवाळी पाणसापाची समुद्री सपाटीपासून २१७ मीटर उंचीवर संशोधकांमार्फत प्रथमच नोंद करण्यात आली आहे.

याबाबत प्रसिध्दीपत्रकातून अनिल गावडे यांनी सांगितले की, रांगणागड समुद्र सपाटीपासून जवळपास ६७९ मी. उंचीवर आहे. पश्चिम घाटात सापडणाऱ्या बऱ्याच सापांच्या जाती रांगणागड परिसरात तसेच पायथ्याला असलेल्या नारूर गावात आढळून येतात. त्यात अजून एक दुर्मिळ बिनविषारी साप ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक (रॅबडॉप्स एक्वाटिकस) म्हणजेच शेवाळी पाणसापाची समुद्री सपाटीपासून २१७ मीटर उंचीवर संशोधकांमार्फत प्रथमच नोंद करण्यात आली आहे.

शेवाळी पाणसाप हा मध्यम आकाराचा असून, हा साप समुद्र सपाटीपासून ७५० ते १००० मीटर उंचीवर सापडतो. हा साप जवळपास ९४ सेमीपर्यंत वाढू शकतो. या सापाचे शरीर मध्यम-बारीक आणि समान चमकदार खवल्यांनी आच्छादलेले असते. डोके मानेपेक्षा किंचित वेगळे तर डोळे मध्यम आकाराचे असतात. पृष्ठभागाचा रंग हिरवा, तपकिरी, शेवाळी असतो आणि मुख्यत्वे हा साप पाण्याच्या ठिकाणी आढळून येतो म्हणूनच याला शेवाळी पाणसाप असे म्हटले जाते.

या प्राण्यांचे संवर्धन गरजेचे

आंबोलीमधून सर्वप्रथम या सापाचा शोध लागला. संशोधकांनी त्याला पाण्यात राहणारा साप म्हणून एक्वाटिकस असे नामकरण केले. आंबोली येथून या सापाची प्रथमच नोंद करण्यात आली होती. आणि आता यात रांगणागडाची अधिक भर पडली आहे. पश्चिम घाटात असे बऱ्याच प्रकारचे दुर्मिळ साप, बेडूक, पाली आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांचा अभ्यास करून त्यांचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे.
 

Web Title: A rare non venomous Moss water snake was found in Ranganagarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.