दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर
By अनंत खं.जाधव | Published: September 2, 2022 11:54 AM2022-09-02T11:54:59+5:302022-09-02T11:55:41+5:30
सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाने खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे.
सावंतवाडी : दोडामार्ग मधील पिकुळे लाडाचेटेंब येथे कृष्णा काशीराम महालकर यांना मध्यरात्री त्याच्या बागेत दुर्मिळ असे खवले मांजर आढळून आले. गेल्या चार दिवसांत दुसर्यांदा दोडामार्ग तालुक्यात खवले मांजर आढळून आले. वनविभागाला ही माहिती कळताच त्यांनी गावात जाऊन खवलेमांजराला ताब्यात घेत त्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
दोडामार्ग तालुक्यात सध्या मोठ्याप्रमाणात दुर्मिळ खवल्या मांजराचे दर्शन होत आहे. चार दिवसापूर्वी उघाडे येथे खवलेमांजर आढळले होते. यानंतर आता पिकुळे येथेही कृष्णा काशीराम महालकर यांना मध्यरात्रीच्या सुमारास बागेत खवलेमांजर निदर्शनास आले. त्यांनी कुत्रे व इतर नैसर्गिक शिकारी यांचेपासून खवलेमांजराचे संरक्षण करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत खवलेमांजर ताब्यात घेवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
जगात सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. या अंतर्गत तालुक्यातील शेतकरी व नागरीक बांधवांना या दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणाकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कामगिरीमध्ये वनक्षेत्रपाल दोडामार्ग कार्यालयाचे वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, वनमजुर विश्राम कुबल, संतोष शेटकर आदींनी सहभाग घेतला.