जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना
By सुधीर राणे | Published: February 23, 2023 11:49 AM2023-02-23T11:49:01+5:302023-02-23T11:49:36+5:30
कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात ...
कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या रागातून तक्रारदाराला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळजनक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली आहे.
या घटनेसंदर्भात सुरज जाधव (कलमठ, मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्या तक्रारीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण याच्यासह आप्पा शिर्के याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपले जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीवरून बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत आपल्याला धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगार्डवर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी आपण कणकवली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
तेथून घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटत लावतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर आपण घरी गेलो. रात्री झोपत असताना माझ्या घराच्या खिडकीतून बाहेर आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी मी घराबाहेर येऊन पाहिले असता रिमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे तेथून पळताना दिसून आले.
पाणी मारून रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकीना देखील आगीची झळ बसली आहे. या आगीत रिक्षेचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. असेही या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात कणकवली पोलिस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.