सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
By अनंत खं.जाधव | Published: November 8, 2023 06:58 PM2023-11-08T18:58:37+5:302023-11-08T18:59:09+5:30
सावंतवाडी : रुग्णवाहिकेला बोलवा असे सांगितल्याच्या रागातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशांत वाडकर या सुरक्षा रक्षकाला एका युवकाकडून ...
सावंतवाडी : रुग्णवाहिकेला बोलवा असे सांगितल्याच्या रागातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशांत वाडकर या सुरक्षा रक्षकाला एका युवकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा रक्षकांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षारक्षकालाच मारहाण होत असेल तर डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयात रात्री उशिरा एक युवक दुचाकी अपघातातील जखमी रुग्णाला घेऊन रुग्णालयात आला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलवा अशा सूचना त्यांना केल्या. याचा राग मनात धरून त्याने आपल्याला बेदम मारहाण केली, असे वाडकर यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी तेथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी भक्ती सावंत यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली, असे वाडकर यांनी सांगितले.
दरम्यान झालेल्या घटनेनंतर अधिक उपचारासाठी वाडकर यांना गोवा येथे हलविण्यात आले आहे वाडकर याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सुरक्षारक्षक संघटना येऊन या ठिकाणी तक्रार देणार आहे, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
रूग्णालयाला पोलीस संरक्षण द्या : डाॅ.ऐवाळे
सावंतवाडीत कोरोना काळात ज्या काहि देवदूतानी काम केले त्यात प्रशांत वाडकर याचेही नाव घेतले पाहिजे त्याने या काळात चांगले काम केले अशा कर्मचारीवर्गावर जर हल्ला होत असेल तर ते योग्य नाही.या प्रकरणाची रूग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून रूग्णालयास पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी सांगितले.