सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
By अनंत खं.जाधव | Published: September 11, 2022 06:13 PM2022-09-11T18:13:56+5:302022-09-11T18:16:12+5:30
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे रातोराथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
सिंधुदुर्ग(सावंतवाडी) : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पेट्रोल पंपासमोर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर काही ग्रामस्थांनी पुढे येत रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याने एकच खळबळ उडाली नेमका हा पुतळा कोणी उभारला हे समजू शकले नाही. मात्र माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा पुतळा उभारण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज देण्यात आले असे समोर आले. पण उर्वरित परवानग्या घेण्यात आल्या नसल्याने उशिरापर्यंत इतर अधिकारी आले नव्हते असे मेंगडे म्हणाले.
मळगाव येथील पेट्रोल पंपासमोर दोन रस्त्याच्या मधोमध असलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रविवारी सकाळी सगळ्यांच्या नजरेस पडला आणि एकच आश्चर्य व्यक्त करण्यात आले नेमका हा पुतळा कोणी उभारला हे समजू शकले नसले तरी ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ही जमा झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची बातमी पोलीस प्रशासनापर्यंत पोहचल्यानंतर तात्काळ त्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला त्यानंतर पशासकीय यंत्रणा चांगलीच सर्तक झाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी ही केली तसेच ग्रामपंचायत कडून माहिती घेतली.
सध्यातरी हा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे तो नेमका कोणाच्या जागेत आहे या सगळ्याची चौकशी होणार आहे. दरम्यान परिसरामध्ये पुतळा उभारण्यास परवानगी मिळावी असा ठराव ग्रामस्थांकडून मळगाव ग्रामपंचायतीत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामसभेत ही ठराव घेण्यात आला होता असेही सांगितले जात आहे.
रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
ग्रामसभेनेही ठराव संमत करताना जिल्हा प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊनच व त्यांच्या अटीची पूर्तता करूनच हा पुतळा उभारण्यात यावा असे म्हटले होते परंतु या संदर्भात कुठलीही कागदोपत्री पूर्तता न करता रातोरात हा पुतळा उभारण्यात आल्याने खळबळ उडाली असून छत्रपती प्रेमी कडून हा पुतळा उभारण्यात आला असून सध्या तरी तो अनधिकृतच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमका पुतळा कोणाच्या जागेत आहे त्या संदर्भात आवश्यक परवानगी घेण्यात आल्या आहेत का या सगळ्या गोष्टींची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. यानंतरच या पुतळ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल असे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ट केले.