घटनेची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचे पथक राजकोटवर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:14 PM2024-08-29T14:14:55+5:302024-08-29T14:15:43+5:30

संदीप बोडवे  मालवण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने महाराष्ट्रात ...

A team of the Forensic Department arrived at Rajkot to investigate the incident of Shivaji Maharaj statue collapsing | घटनेची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचे पथक राजकोटवर दाखल

घटनेची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचे पथक राजकोटवर दाखल

संदीप बोडवे 

मालवण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून घटनेची चौकशी करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास केला. यावेळी राजकोट किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

चौकशी समिती स्थापन..

पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. 

कडेकोट पोलिस बंदोबस्त..

राजकोट किल्यावर बुधवारी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. राजकोट किल्ल्याचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी बंद करण्यात आले असून या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या प्रकारा नंतर पोलीस व प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजकोट किल्ला परिसरात दंगा काबू पथक व राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे.

Web Title: A team of the Forensic Department arrived at Rajkot to investigate the incident of Shivaji Maharaj statue collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.