व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात
By सुधीर राणे | Published: October 4, 2022 03:56 PM2022-10-04T15:56:30+5:302022-10-04T16:07:06+5:30
चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती
कणकवली : फोंडाघाटाच्या पायथ्यापासून काही अंतरावर, पिंपळवाडी येथील एका वळणावर आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक अवजड ट्रकचा (क्रमांक एम.एच. ११ ए.एल.५०२०) पुढील व्हील एक्सल तुटल्याने आणि टर्न न बसल्याने, लगतच्या शेतात उलटल्याने अपघात झाला. या ट्रकमध्ये सिमेंट भरलेले असून तो कोल्हापूरहून कणकवली मार्गे गोव्याकडे जात होता. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला प्रथम दर्शनीनी फोंडाघाट तपासणी नाक्यापर्यंत पोहोचविले. तेथील पोलीस शिपाई यांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाण्यासाठी रिक्षा करून दिली. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत त्याचा ठावठिकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा गावातील इतर खासगी डॉक्टरांकडे चौकशी अंतीही लागला नाही. त्यामुळे चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती. शिवाय पोलीस तपासणी नाक्यावर त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
फोंडाघाट आय.टी.आय. ते साईमंदिर आणि तपासणीनाका ते घाटरस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकाना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच क्लीनर शिवाय येणाऱ्या मोठ्या अवजड ट्रक सारख्या वाहनांना अपघातास सामोरे जावे लागते आहे. मंगळवारी झालेला अपघात मोठ्या खड्ड्यामुळे, पॉवर व्हीलर एक्सेल तुटल्याने झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रस्ते विभागाने गांभीर्याने लक्ष घालून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुसह्य करावा, आणि संभाव्य अपघात हानी तसेच जनक्षोभ टाळावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.