Sindhudurg: खारेपाटण चेकपोस्ट येथे अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, चालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 01:39 PM2024-12-05T13:39:57+5:302024-12-05T13:40:56+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आज गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अवैधरित्या ...
संतोष पाटणकर
खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आज गुरुवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. गुरांची कत्तल करण्यासाठी नेत असल्याचा संशय असल्यामुळे एकच खळबळ उडाली.
सावंतवाडीवरून मुंबईच्या दिशेने ट्रक क्रमांक- के.ए-२५-बी १५०५ निघाला होता. खारेपाटण चेक पोस्ट येथे ट्रक आला असता पोलीस कर्मचारी यांना संशय आल्याने वाहन तपासले असता यात गावठी गायी व वासरे अशी मिळून सुमारे १९ पाळीव जनावरे आढळून आली. अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याचे यावेळी निष्पन्न झाले. दरम्यान चालक आदम अली इसफ नेत्रिकर (रा. आजरा,कोल्हापूर) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. तर गाडीचा क्लिनर फरार झाला.
दरम्यान अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सबंधित वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खारेपाटण पोलिस करीत आहेत. कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली.