कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या बॅगेतून महिलेने रोकड केली लंपास, बँकेतच घडली घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:29 PM2023-02-15T17:29:02+5:302023-02-15T17:29:32+5:30

हातचलाखीने बॅगमधील दोन नोटांची बंडल लंपास केली

A woman stole cash from the bag of a Kankavali Nagar Panchayat employee, Caught on CCTV camera | कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या बॅगेतून महिलेने रोकड केली लंपास, बँकेतच घडली घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या बॅगेतून महिलेने रोकड केली लंपास, बँकेतच घडली घटना; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Next

कणकवली : कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी संजय रविकांत राणे (रा. टेंबवाडी) हे मंगळवारी सकाळी १२.१५ वाजता बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली येथे कार्यालयातील रोख २ लाख ६ हजार ४१० रुपये ही रक्कम भरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन अज्ञात महिलांपैकी एका महिलेने हातचलाखीने त्यांच्या बॅगमधील दोन नोटांची बंडल लंपास केली. ५६ हजार ४१० रुपये इतकी ती रक्कम होती.
याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केला आहे, तर त्या दोन महिला चोरी करताना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.

कणकवली नगरपंचायतमधील विविध कर स्वरूपातील जमा झालेली रक्कम रोखपाल प्रियांका सोन्सूरकर यांनी बँकेत जमा करण्यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी संजय राणे (रा. कणकवली, टेंबवाडी) यांच्याकडे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दिली. संजय राणे हे ५०० रुपयांची ५० हजारांची ४ बंडल, ६ हजार ४१० रुपयांचे १ बंडल अशी एकूण २ लाख ६ हजार ४१० रुपये रक्कम घेऊन बँक ऑफ इंडिया शाखा, कणकवली येथे गेले.

तिथे गेल्यावर बॅगेत पैसे असल्याची खात्री केली. दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांनी बँक स्लीप काउंटरवरील कर्मचाऱ्याकडे दिली. बॅगेतून सर्व पैसे काढल्यावर ५६ हजार ४१० रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संजय राणे यांनी नगरपंचायतच्या रोखपाल प्रियांका सोन्सूरकर यांच्याशी संपर्क साधून पैसे कमी आहेत, असे सांगितले. तेव्हा प्रियांका सोन्सूरकर यांनी सर्व रक्कम तुम्हाला दिली होती, असे सांगत संजय राणे यांना कार्यालयात परत बोलाविले. कार्यालयात पैशांची खात्री केल्यावर त्या दोघांसह अन्य कर्मचारी परत बॅंकेत आले.

त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्यांच्या संमतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता एका महिलेने संजय राणे यांच्या बॅगेतून पैशांची दोन बंडल बाहेर काढल्याचे दिसत आहेत. ती चोरी केलेली दोन बंडल दुसऱ्या एका बॅगेत ठेवून ती बॅगसोबतच्या महिलेच्या ताब्यात दिल्याचेही सीसीटीव्हीत दिसले. त्या महिलेने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.

संजय राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दोन अज्ञात महिलांच्या विरोधात कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. शहरातील अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिस करीत आहेत.

Web Title: A woman stole cash from the bag of a Kankavali Nagar Panchayat employee, Caught on CCTV camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.