समुद्राच्या पाण्याखालचा अद्भुत खजाना, पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:01 PM2024-01-03T14:01:44+5:302024-01-03T14:02:45+5:30

निवती रॉक्स समुद्रात होते डिस्कवर स्कुबा..

A wonderful treasure under the sea, astonishes tourists as well as scholars | समुद्राच्या पाण्याखालचा अद्भुत खजाना, पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित

समुद्राच्या पाण्याखालचा अद्भुत खजाना, पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित

संदीप बोडवे

मालवण: मालवण येथील इंडीयन इन्स्टिटयुट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्ट्सचे (इसदा) स्कुबा डायव्हर्स निवती जवळील समुद्राच्या पाण्यात अद्भुत खजिन्याचे दर्शन घडवीत आहेत. पाण्याखालचे सागरी विश्व पाहून पर्यटकांबरोबरच अभ्यासकसुध्दा अचंबित झाले आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इसदा या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामार्फत निवती रॉक्स जवळील समुद्रात डिस्कवर स्कुबा डायव्हिंग केले जाते. 

आधुनिक दर्जाची बोट - तारकर्ली येथील जेटी पासून समुद्रात १८ किमी लांब असलेल्या निवती रॉक्स परिसरात आरमार नावाच्या आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या बोटीतून नेले जाते. याठिकाणी ८ ते १२ मिटर पर्यंत डिस्कवर स्कुबा डायव्हिंग केले जाते. 

सुरक्षिततेबाबत खबरदारी 

स्कुबा इन्स्ट्रक्टर आणि डाईव्ह मास्टर दर्जाचे प्रशिक्षक प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक रित्या गाईड करतात. स्कुबा डायव्हिंगचा पोशाख, उपकरणे आणि सिलेंडर परिधान केल्या नंतर समुद्रात उतरविले जाते. 

कोण घेतात लाभ - भारत आणि भारत बाहेरील पर्यटक, समुद्री अभ्यासक, स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, सैन्य, अग्निशमन आदी दलांच्या विशेष तुकडीचे सदस्य. 

तज्ञ प्रशिक्षक दिमतीला 

डिस्कवर स्कुबा डायव्हिंग करताना इसदाचे तज्ञ स्कुबा प्रशिक्षक सोबत असतात. पाण्यात उतरण्याच्या अगोदर प्रशिक्षण केंद्रामधील डायव्हिंग पुल मध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच समुद्राच्या पाण्यात उतरविले जाते. 

कुठे आहेत निवती रॉक्स - मालवण, वेंगुर्ल्याच्या सीमेजवळील समुद्रात खडकाळ डोंगरांची रांग आहे. याठिकाणी ब्रिटिशकालीन दिशादर्शक लाईट हाऊस आहे. येथे ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, मिडल आयलंड, फणसा, क्लास रूम(बंदरा) आदी नावाने ओळखले जाणारे समुद्रात डोंगर आहेत. तर शेजारीच समुद्राच्या पाण्याबाहेर आलेले अनेक छोटे छोटे खडक असून गॉडझिलाच्या आकाराचा खडक विशेष प्रसिद्ध आहे. 

समुद्री जीवांचा खजिना

येथील पाण्यात नेपोलियन रास फिश, घोस्ट पाईप फिश, बांबू शार्क, स्क्रॉल्ड फाईल फिश, युनिकॉन फिश, स्मुथ फ्लुट माऊथ फिश, ट्रॅव्हली फिश, पॅरट फिश, सि अर्चिन, ट्रिगर फिश, स्टोन फिश, स्कॉर्पियन फिश, बॅराकुडा फिश, ग्रुपर फिश, बटरफ्लाय फिश, लायन फिश, फ्लॉवर पॉट कोरल्स, स्ट्रिंग रे, कासव, खेकडे, सि कुकुंबर, लॉबस्टर, स्वीट ल्फिफ्ट, आदी समुद्री जीवांचा खजिना पहावयास मिळतो. 

कोरल, रॉकी आणि सँडी असे तिन्ही प्रकारचे रीफ याठिकाणी पहावयास मिळतात. समुद्री जीवांची विविधता थक्क करणारी आहे. हा अधिवास जपला गेला पाहिजे. इसदा अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन करून स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देत असते. यासाठी अतिशय अनुभवी स्थानिक प्रशिक्षकांची टीम कार्यरत आहे. - सूरज भोसले, व्यवस्थापक तथा स्कुबा प्रशिक्षक 

Web Title: A wonderful treasure under the sea, astonishes tourists as well as scholars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.