मिठबांव येथील तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, मृतदेह गाडीत टाकून मारेकरी पसार; देवगड तालुका हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:46 PM2023-09-19T12:46:39+5:302023-09-19T13:12:50+5:30
देवगड : मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (३१) या युवकाच्या निर्घृण खुनाने देवगड तालुका हादरला आहे. ही घटना सोमवारी ...
देवगड : मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (३१) या युवकाच्या निर्घृण खुनाने देवगड तालुका हादरला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ३:३०च्या सुमारास मुणगे मसवी रस्त्यावर घडली. कोयता किंवा सुरा यांसारख्या धारदार शस्त्राने चेहऱ्यावर, डोक्यावर, अंगावर वार करून, प्रसादची त्याच्या स्वतःच्या गाडीतच हत्या करून, मृतदेह गाडीत उलट्या अवस्थेत टाकून मारेकरी पसार झाले. जाताना प्रसाद याच्या गाडीची चावी व त्याचा मोबाइल मारेकऱ्यांनी आपल्याबरोबर नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद हा मिठबांव येथे महा ई-सेवा केंद्र चालवित होता, तसेच तो भाड्याने चारचाकी देण्याचा व्यवसायही करीत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्यांनी सकाळी रुग्णाला घेऊन कुडाळ येथे न्यायचे असल्याने, तुझी गाडी घेऊन ये, असे सांगितले. प्रसाद सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारासच उठून त्याच्या मालकीची कार घेऊन भाडे नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र, आपण कोणाचे भाडे घेतले आहे, अथवा त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी घरात आई-वडील व पत्नीला दिली नसल्याने याबाबत उलगडा होऊ शकला नाही.
दरम्यान, सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मिठबांवचे सरपंच भाई नरे यांना मसवी येथे कारचा अपघात झाला आहे, असा फोन आल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे मसवी रस्त्यावर कारचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यावर ही गाडी मिठबांव येथील तात्या लोके यांची असल्याचे लक्षात आले. गाडीमध्ये त्यांनी पाहिले असता, प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत उलट्या स्थितीत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसल्यानंतर, त्यांनी देवगड पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली.
लवकरच छडा लावणार : नीळकंठ बगळे
दरम्यान, याबाबत देवगडचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे म्हणाले, या खून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, फोन कॉल्स डिटेल्स मागविण्यात आले असून, त्यातून उलगडा होण्याची शक्यता आहे.