गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 15, 2024 06:44 PM2024-03-15T18:44:58+5:302024-03-15T18:45:07+5:30
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग ) : शिरोडा वेंगुर्ला सागरी मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी ...
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग ) : शिरोडा वेंगुर्ला सागरी मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात सागरतीर्थ न्हैचीआड येथील संकेत किशोर पेडणेकर या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
संकेत हा गोवा येथे मोपा विमानतळावर कामाला होता. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास गोवा कामावरून घरी परतत असताना शिरोडा वेंगुर्ला मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे संकेत याच्या ताब्यातील एमएम ०७एके ६१२० या नंबरची हिरो पेंशन एक्स प्रो ही दुचाकी रस्त्याच्या डाव्या कडेला खाली जाऊन बाजूला असलेल्या लोखंडी गेट आदळली व हा अपघात झाला.
दरम्यान या घटनेची माहिती मध्यरात्री २.३० च्या दरम्यान तेथून जाणाऱ्या टेम्पो चालकाने वेंगुर्ला पोलिसांना दिल्यानुसार त्याठिकाणी पेट्रोलिंग करणारे वेंगुर्ला पोलिस हेड कॉन्स्टेबल बंड्या धुरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तावडे व होमगार्ड घाडीगावकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वेंगुर्ला पोलिसांनी आपल्या वाहनात घालून संकेत याला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या अपघाताचा तपास वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. मृत संकेतच्या पश्चात आई, वडील व बहीण, काका काकी असा परिवार आहे.